ठाणे :
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना एकाच अर्जावर मिळणार आहे. शेतक-यांनी या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधावी, त्यातून शेतक-यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक डॉ.अंकुश माने यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शहापूर येथील कार्यक्रमात केले.
डोळखांब हेदवली येथील बबन हरणे यांच्या साई ऍग्रो नर्सरी येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात तमाने बोलत होते.भाजीपाल्याची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीला प्राधान्य देण्याचा सल्ला देत शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन जिल्हा कृषी अधिकारी दिपक कुटे यांनी मार्गदर्शन केले. निर्यातक्षम भेंडी याविषयावर वास्तव ,बदलते हवामान या विषयावर शेतकऱ्यांना ग्रामीण शैलीने कर्जत कृषी केंद्राचे संशोधक राजेंद्र सावळे यांनी मार्गदर्शन केले.बचत गट अथवा स्वयं सहाय्यतेने शेतीजन्य उत्पादनाकडे लक्ष द्यावे असा सल्ला विभागीय उपसंचालक डॉ.पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला.या तालुक्यात भेंडी आणि काकडीचे उत्पादन दर्जेदार होत असले तरी विक्री व्यवस्थापनासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल असे तिसाई कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश भांगरथ यांनी स्पष्ट केले.तर डॉ.राजेंद्र गाढवे यांनी मत्स्य शेतीबाबत उत्कृष्ट मार्गदर्शन केले.यावेळी कल्याण कृषी उपविभागीय अधिकारी सुधीर नयनवाड,तालुका कृषी अधिकारी अमोल अगवान,जि.प.सदस्य काशिनाथ पष्टे, प्रगतशील शेतकरी बबन हरणे,ऍड.प्रशांत घोडविंदे,महेंद्र भेरे,जनार्दन भगत यांसह मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी उपस्थित होते.