ठाणे : जिल्हा परिषदेच्या (जि.प.) १५९ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ गुरुवारी देण्यात आला आहे. याप्रमाणेच बांधकाम, पशुसंवर्धन आणि अर्थ विभागाच्या १६ कर्मचाऱ्यांची पदोन्नती जिल्हा परिषदेने केली आहे. या वरिष्ठ वेतन श्रेणीसह पदोन्नतीचे आदेशही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी जारी केले आहेत.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार सेवेतील लाभ मिळावेत, यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवारदेखील आग्रही होते. शिक्षकांनी सेवेची १२ वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ दिला जातो. दरवर्षी ही प्रक्रिया होत असते. यंदा कोविड परिस्थिती असतानाही शिक्षक वेतनश्रेणीपासून वंचित राहू नये यासाठी नियमांची अंमलबजावणी करून अंबरनाथ तालुक्यातील १४ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यात आला आहे. तर भिवंडीतील २२, कल्याण येथील १३, मुरबाड ३७ आणि शहापूरचे ७३ अशा १५९ शिक्षकांना या वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी संतोष भोसले यांनी दिली.
अर्थ विभागाचे एक सहायक लेखा अधिकारी, चार कनिष्ठ लेखा अधिकारी, सात वरिष्ठ सहायक लेखाधिकारी अशा एकूण १२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी आदेश जारी झाले आहेत. दोन कनिष्ट सहायक लेखाधिकाऱ्यांना आश्वासित प्रगत योजनेचा लाभ दिल्याची माहिती मुख्य लेखा व वित्ताधिकारी सुभाष भोर यांनी दिली. बांधकाम विभातील कनिष्ट आरेखक यांना आरेखक पदावर पदोन्नती देण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता नितीन पालवे यांनी दिली. तर पशुसंवर्धन विभागातील सहायक पशुधन विकास अधिकारी पदावर तीन जणांना पदोन्नती देल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार यांनी दिली.