मीरा रोड : मीरा-भार्इंदरमधील काही खाजगी शाळांच्या बसवर ‘बेस्ट’चे कर्मचारी हे अर्धवेळ काम करतात. दुहेरी कामामुळे त्यांची विश्रांती पूर्ण होत नसल्याने गेल्या महिन्यात अपघात झाला होता. यामुळे शाळेच्या बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असून असे बसचालक व त्यांच्या शाळांवर कारवाईची मागणी मनसेच्या विद्यार्थी शाखेने केली आहे.
मनविसेचे शहर सचिव शान पवार, अविनाश हिरेमठ, सुनील कदम, साई परब, दादा कदम, राजेश जवळकर, मनोज शास्त्री, करण पवार, क्षितिज साळवे आदींच्या शिष्टमंडळाने पालिका उपायुक्त दीपक पुजारी यांची भेट घेत याबाबत निवेदन दिले. मीरागाव येथील एपी इंटरनॅशनल शाळेच्या बसवर कंत्राटदाराच्या आड चालक म्हणून बेस्टचे कर्मचारी काम करत असल्याची तक्रार त्याच शाळेतील प्रवीण घाडगे या चालकाने केली आहे. कंत्राटदार हा शाळेकडून बसचालकाचे दरमहिना १६ हजार वेतन घेत असताना चालकांना मात्र केवळ सहा ते आठ हजार रुपयेच दिले जातात. कारण, बेस्टचे कर्मचारी कंत्राटदारामार्फत कमी वेतन घेऊन शाळेच्या बस चालवण्याचे काम करतात. या बेस्टचालकांकडून त्यांची बेस्टमधील कामाची वेळ सांभाळून खाजगी शाळांच्या बस चालवण्याचे दुहेरी काम करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.
बेस्ट व खाजगी शाळांच्या बसवर चालक म्हणून काम करत असल्याने विश्रांती पूर्ण झाली नाही, म्हणून २८ जानेवारीला एपी इंटरनॅशनल शाळेच्या बसला अपघात झाला होता. त्यावर काम करणारा बेस्टचा चालक पळून गेला असला, तरी या कर्मचाºयाचे शाळेच्या बसवर काम करत असल्याचे हजेरीपत्रकच सादर करण्यात आले.अन्य शाळांमध्येही प्रकारशहरातील केवळ ही एकच शाळा नसून अनेक शाळांमध्येही बेस्टचे चालक दुहेरी काम करत आहेत. शाळा व्यवस्थापन, कंत्राटदार व बेस्टचालकांंच्या संगनमताने पैसा वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार सहन करणार नाही, असा इशारा मनविसेने दिला आहे. तिघांवर कारवाई करण्यासह सखोल चौकशीची मागणी केली आहे.