अंबरनाथ- येथील अंबर भरारी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित तिस-या अंबरनाथ चित्रपट महोत्सवातील पारितोषिक वितरण सोहळा अंबरनाथ गावदेवी मैदानावर झाला. या महोत्सवात ‘कॉपी' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. तर ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अंबर भरारी या ग्रुपच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी देखील अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. सतारवादक भूपाल पणशीकर यांच्या सादरीकरणाने महोत्सवाची सुरूवात झाली. त्यानंतर नर्तक रमेश कोळी आणि त्यांच्या विद्यााथ्र्यांनी विविध समूह नृत्ये सादर केली. ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तब्येत ठिक नसतानाही विजय चव्हाण या पुरस्कार स्वीकारण्यासाठी आवर्जून हजर होते. आपल्या छोटेखानी मनोगतात त्यांनी समस्त रसिकांचे आभार मानले. तसेच दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांना विशेष स्मृती पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या कुटुंबियांनी या पुरस्कार स्वीकारला. ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. तर ‘कॉपी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट म्हणून गौरविले गेले. यावेळी अभिनेते मंगेश देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठी चित्रपटांची स्थिती सर्वांसमोर मांडली .अतिशय वेगळे विषय ताकदीने मांडून सध्याच्या मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळा ठसा उमटविला असला तरी अजूनही महाराराष्ट्रात सिनेमांना थिएटर मिळणे अवघड बनले आहे. अनेक चांगले मराठी चित्रपट केवळ थिएटर मिळत नसल्याने प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यात १८ टक्के जीएसटी लागल्याने अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यात जीएसटीच्या अनेक जाचक अटी बदलल्या गेल्या. फेररचना गेली गेली. मात्र रसिकांचे मनोरंजन करणा-या चित्रपटसृष्टीवरील जीएसटी काही कमी झाला नाही. या व्यवसायातील अडचणी आणि अनिश्चितता समजून घेऊन शासनाने जीएसटीचा दर कमी करावा, असे आवाहन अभिनेते मंगेश देसाई यांनी अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात केले. यावेळी अभिनेते संतोष जुवेकर, सुनील तावडे, अभिनेत्री प्रेमाकिरण, प्रिया गमरे, विशाखा सुभेदार, दिग्दर्शक गिरीश मोहिते, अजित शिरोळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहरप्रमुख अरविंद वाळेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, महेंद्र पाटील, जगदिश हाडप, गिरीश पंडित, डॉ. राहुल चौधरी, डॉ. कुणाल चौधरी, अभय शिंदे आदींनी महोत्सवाच्या आयोजनात पुढाकार घेतला.