डोंबिवली : विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले गुण शोधून त्याचे संवर्धन करणारे सर्वोत्तम शिक्षक असतात, असे प्रतिपादन कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सोमवारी केले. छत्रपती शिक्षण मंडळाच्या कल्याणमधील पारनाका विभागातील अभिनव विद्यामंदिरमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून सोमवारी आयोजित केलेल्या शिक्षक सन्मान सोहळ्यात पवार बोलत होते. यावेळी भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे, अभिनव विद्यामंदिरचे मुख्याध्यापक संपत गीते आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या काळात शिक्षकांनी विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून शिक्षण देण्याचे भरीव काम केले. शाळा बंद असल्या तरी शिक्षणात खंड न पडता अध्यापनाचे काम केल्याने सर्व शिक्षकांचे कौतुक करून पवार यांनी शिक्षकांचा सत्कार केला.
स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन
५ वी स्कॉलरशिप, ८ वी स्कॉलरशिप, एनटीएस, एनएमएमएस यासारख्या केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय परीक्षांमध्ये कल्याणमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी मोफत मार्गदर्शन वर्ग आयोजित करणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.