मुंब्रा : येथील बायपासजवळ आढळलेला साप घेऊन फिरणे एका तरुणाच्या जिवावर बेतल्याची घटना उघडकीस आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मो. इब्राहिम शेख हा सोमवारी दुपारी बायपास येथे गेला होता. तेथे त्याला साप आढळला. त्याला पकडून तो इतरांना दाखवत फिरत होता. त्यावेळी सापाने त्याला काही ठिकाणी दंश केला. यापासून अनभिज्ञ असलेल्या शेख याने काही वेळाने स्थानिकांच्या सांगण्यावरून सापाला सोडून दिले. तोपर्यंत सापाचे विष शरीरात भिनल्यामुळे गलितगात्र होऊन तो गावदेवी मंदिराच्या परिसरात आडोशाला टेकून बसला. काही स्थानिक नागरिकांनी त्याला कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तो संजयनगर परिसरात राहत होता.
साप घेऊन फिरणे बेतले जिवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:42 AM