ठाणे: शनिवारी रात्रीचे ९.४० ते रविवारी सकाळी ७.४० वाजेपर्यंतच्या दहा तासांमध्ये ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका मागून एक असे वेगवेगळया कारणांमुळे १८ जणांचे मृत्यू झाले. अवघ्या पाच ते सहा तासांमध्येच हे मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली. अगदी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यापासून ते ठाण्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी याठिकाणी धाव घेत प्रशासनाला याचा जाब विचारला. परंतू हे मृत्यू रुग्णालयाच्या हलगर्जीपणा नसून रुग्णालयावरील अतिरिक्त ताणामुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. काही तासांमध्ये १८ मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
शनिवारी सायंकाळी ५.४५ वा. ताप आणि श्वासाच्या त्रासाने आलेल्या कोपरीच्या सुनिल पाटील यांचा पहिला मृत्यू झाला. भानुमती पाधी या ८३ वर्षीय वृद्धेला ९ आॅगस्ट रोजी दाखल केले होते. तिचा १३ आॅगस्टच्या रात्री ९.४० वा.दुसरा युरिनरी इन्फेक्शनमुळे मृत्यू झाला. त्यानंतर ७ आॅगस्टला एका शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या गीता या महिलेचा १०.४५ वाजता तिसरा मृत्यू झाला. नंतर १२ आॅगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता ताप आिण श्वासोच्छश्वासाच्या त्रासामुळे आलेल्या भास्कर चाबूकस्वार (३३) यांचा त्याच रात्री ११.१५ वाजता मृत्यू ओढवला. तर रॉकेल पिल्यामुळे चेतक गोडे या चार वर्षीय बालकाला शहापूर येून ८ आॅगस्ट रोजी दाखल केले होते. त्याचा १३ आॅगस्ट रोजी १२.५५ ला मृत्यू झाला. त्यानंतर ९ आॅगस्ट रोजी कल्याणच्या रस्ते अपघातातील श्वासोच्छोवासाच्या त्रास असलेल्या ललीताबाई चव्हाण (४२) हिचा रविवारी पहाटे १.१५ वाजता सहावा मृत्यू झाला.
पुढे काही मिनिटांच्या अंतराने तिघांनी प्राण सोडले. यात १२ आॅगस्टला बेशद्धावस्ेत श्वासाच्या त्रासाने दाखल झालेल्या उल्हासनगरच्या अशोक जैस्वाल (५३) यांचा रविवारी पहाटे २.५३ वाजता आठवा मृत्यू झाला. तर तीन मिनिटांनी पहाटे २.५६ वाजता ताराबाई घगे (५६) यांचा नववा मृत्यू झाला. त्यानंतर २.५७ वाजता शस्त्रक्रिया विभागातील भिवंडीच्या अमरीन अन्सारी (३३) यांचा दहावा मृत्यू झाला. पहाटेच्या ३.१५ वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेटच्या सुनिता इंदूलकर (७०) यांचा अकरावा तर ३.२६ वा नूर खान (६०, साकीनाका, मुंबई) यांचा १२वा मृत्यू झाला.
३.३० वाजता एकाचवेळी सनदी मो. हसन (६६) या महिलेचा, निनाद लोकुर (५२) या कल्याणच्या पुरुषाचा, अब्दुल खान (५८, गोवंडी) या ताप आणि श्वासाच्या रुग्णाचा, कल्पना हुमणे (६५, शहापूर) या अपघातातील महिलेचा अशा चौघांचा मृत्यू ओढवला. पुढे पहाटे ४ वाजता निमोनियाच्या भगवान पोतदार (६५, उपवन, ठाणे) यांचा सतरावा आणि सकाळी ७.४० वाजता अशोक निचल या ८१ वर्षीय वृद्धाचा १८ वा मृत्यू झाला. एका मृत्यूच्या माहितीमुळे दुसºयाचे नातेवाईक सावरत असतांना त्यांना आपल्याही रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती बाहेर येत होती. त्यामुळे एका मागून एक डॉक्टर आणि परिचारिकांची याठिकाणी धावपळ सुरु असतांनाच रुग्णांच्या नातेवाईकांचे आक्राेश आिण विव्हळने भल्या पहाटे सुरु हाेते.या सर्वांचे मृत्यू वाचविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. मात्र त्यांना वाचविण्यात अपयश आले. यात कोणीही हलगर्जीपणा केलेला नसल्याचा दावा अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी केला असला तरी या मृत्यूंबद्दल संपूर्ण शहरातून रुग्णालय प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त हाेत आहे.