सदानंद नाईकउल्हासनगर : महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी शहरातील बोगस डॉक्टरांवरील कारवाईसाठी एका समितीची स्थापना केली. आयुक्तांच्या निर्णयाने बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले असून कारवाई पूर्वीच झोपडपट्टी परिसरातील अनेक डॉक्टर गायब झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
उल्हासनगरातील झोपडपट्टी भागात बोगस डॉक्टरांनी आपले जाळे पसरविले आहे. अश्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. अखेर आयुक्त अजीज शेख यांनी अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन एका कमिटीची स्थापना केली. उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड व इतर राज्यातुन बोगस सर्टिफिकेट मिळवून शहरातील झोपडपट्टी भागात बोगस डॉक्टरांनी दवाखाने थाटले असून यापूर्वी बोगस डॉक्टरांवर महापालिकेने कारवाई केली होती.
मात्र कोरोनानंतर महापालिका आरोग्य विभागाचे बोगस डॉक्टरांवर दुर्लक्ष झाले आहे. स्थापन केलेल्या समितीची बैठक गुरवारी स्थायी समिती सभागृहात आयुक्त अजीज शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. समिती ही नागरी आरोग्य केंद्र निहाय बोगस डॉक्टरांचे सर्वेक्षण करुन, त्यांच्यावर कारवाई करणार आहे.