लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: आगामी दसरा किंवा दिवाळीसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होण्याची अधिक शक्यता आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात अशा प्रकारचे १३ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये सहाजणांना अटक केली असून, चार गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
फेस्टिव्हल ऑफर्सचे शेवटचे काही दिवस किंवा अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे तत्काळ याचा फायदा घ्या, असे संदेश मोबाईलवर पाठविले जातात. त्याला काही महिला किंवा सुशिक्षित वर्गही भुलतात. यामध्ये कोणतीही खात्री न करता एखाद्या लिंकवर क्लिक केले की, त्याचवेळी संबंधितांच्या बँक खात्यातून पैसेही दुसऱ्याच्या खात्यात वळते होतात. नंतर ही लिंक किंवा ते खाते अथवा मोबाईल क्रमांकही नॉट रिचेबल होतो.
* अशी होऊ शकते फसवणूक -
फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली मोबाईलवर बनावट लिंक पाठवून त्यावर सावज हेरले जाते. खात्री न करता जर या लिंकवर क्लिक केले की, तुम्ही आमचे बेस्ट ग्राहक आहात, कंपनीने तुमची निवड केली आहे, असे सांगून गंडा घातला जातो.
* आगामी नवरात्रौत्सवाचा काळ सुरू होणार असल्यामुळे लॉटरी लागल्याचेही संदेश पाठविले जात आहेत. या लॉटरीची रक्कम मिळण्यासाठी टप्प्याटप्प्याने ओटीपी आणि काही जणांकडे पैसे मागितले जातात. मात्र, या संदेशांकडे दुर्लक्ष करणेच हिताचे असल्याचे ठाणे सायबर सेल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
* ही घ्या काळजी -
ऑनलाईन खरेदी करताना सावधगिरी बाळगा. आवडलेली वस्तू ऑर्डर करताना कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडा. एखादी वस्तू आवडल्यास विश्वासार्ह ॲपवरून खरेदी करा. खरेदी करण्यापूर्वी साईटचीही खात्री करा. साईटला रेटिंग किती आहेत? याचीही तपासणी करा. कोणत्याही लिंकवर क्लिक करणेही टाळावे.
अशोक मोराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर