ठाणे : शिवसेना सचिव व होम मिनिस्टरफेम भावोजी आदेश बांदेकर यांची सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने दादरमधील शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. आगामी काळात सदा सरवणकर यांना दूर करून दादरमध्ये पुन्हा बांदेकर यांना प्रस्थापित करण्याकरिता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने त्यांची नियुक्ती केल्याचे बोलले जात आहे.न्यासावर यापूर्वी काम केलेल्या विशाखा राऊत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले सुभाष मयेकर उत्सुक असताना त्यांना डावलून बांदेकरांची नियुक्ती केल्याचे बोलले जाते. बांदेकर यांच्याकडे शिवसेनेचे सचिवपद, रायगड जिल्हा संपर्कप्रमुखपद, चित्रपट सेना अध्यक्षपद, अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे महापालिका ट्रस्टी अशी पदे असताना त्यांच्या न्यासावरील नियुक्तीने दादरचे शिवसैनिक अस्वस्थ आहेत. ‘शिवसेना संपवण्यासाठी आलेल्यांना पदे दिली जात असून आंदोलने, मारामाºया, पोलीस केसेस आणि मार खाल्ला, निवडणुकीत जीव तोडून काम केले, असे शिवसैनिक बेकार आहेत. राजा तुपाशी, प्रजा उपाशी, अशी सध्याची परिस्थिती असून बाळासाहेबांचे आदेश आठवा. अन्याय सहन करू नका. पेटून उठा’, असे संदेश सध्या व्हॉट्सअॅपवर फिरत आहेत. बांदेकर हे छोट्या पडद्यावरील शूटिंगमध्येही व्यस्त असतात. सिद्धिविनायक मंदिराच्या अध्यक्षाला मदतीच्या अर्जांपासून, सुरक्षेच्या मुद्द्यांपर्यंत अनेक विषय रोज हाताळावे लागतात. त्यांच्याकडे अगोदरच इतकी जबाबदारी असताना ते यासाठी वेळ काढतील किंवा कसे, असा सवाल केला जात आहे.पनवेलच्या निवडणुकीची जबाबदारी बांदेकर यांच्याकडे होती. त्यात सेनेला भोपळाही फोडता आला नाही. इतके अपयश मिळूनही बांदेकर यांना पद देऊन पक्षाने चुकीचा संदेश दिल्याचे बोलले जात आहे.
भावोजींना सिद्धिविनायक पावल्याने शिवसेनेत अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 1:58 AM