- राजू काळे
भाईंदर - येथील स्थानिक रहिवासी प्रदीप धानुका यांनी भाईंदर पोलिसांच्या सहकार्याने नुकतीच ‘द्या आणि घ्या’ या तत्वावर आधारीत ‘नेकी कि दिवार’ संकल्पना सुरु केली आहे. या संकल्पनेनुसार ज्यांच्याकडे विनावापराच्या वस्तू आहेत ते त्या वस्तू एका निश्चित ठिकाणी ठेवतील, ज्यांना त्या वस्तूची गरज आहे ते त्या वस्तू त्या ठिकाणाहूनच घेतील, असा कयास त्यामागे लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राबविण्यात आलेली हि संकल्पना देशातील पहिलीच संकल्पना असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते लायन्स क्लब ऑफ मीरा-भाईंदर गॅलेक्सीचे वरीष्ठ सदस्य असुन ते लायन्स क्लबच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदत करीत असतात. या सततच्या मदतीला एक वेगळी जोड देण्याचा विचार त्यांच्या डोक्यात गेल्या अनेक दिवसांपासून घोळत होता. अखेर त्यांना इंग्रजी भाषेतील ‘गीव्ह अॅन्ड टेक’ हि संकल्पना आठवली. त्याच धर्तीवर त्यांनी ‘द्या आणि घ्या’ हि संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला. त्याला माणूसकीची जोड देत नेकी कि दिवार, असे गोंडस नाव देण्याचे त्यांनी निश्चित केले. त्यासाठी पुरेशी व लोकांच्या नजरेत चटकन येणाऱ्या जागेची अडचण त्यांच्यापुढे उभी राहिली. ती जागा त्यांना भाईंदर पोलिस ठाण्याच्या आवारात आढळून आली. मात्र त्यासाठी पोलिस सहकार्य करतील का, असा प्रश्न देखील त्यांच्या मनात आला. मग त्यांनी थेट भाईंदर विभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक अतुल कूळकर्णी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी त्यांच्यापुढे ‘द्या आणि घ्या’ ची संकल्पना मांडली. ती कूळकर्णी यांना पटल्याने त्यांनी भाईंदर पोलिस ठाण्यातील मुख्य रस्त्याच्या बाजुुला असलेल्या एका कोपऱ्यातील भिंतीवर लाकडी कपाट बसविण्यास धानुका यांना संमती दिली. धानुका यांनी तेथे सुमारे १० फूट उंच व ५ फूट रुंदीचे तीन खणांचे लाकडी कपाट नुकतेच बसविले. त्या ‘नेकी कि दिवार’ द्वारे ज्यांच्याकडे विनावापराच्या वस्तू आहेत अथवा अडगळीतील वस्तू ज्यांना नको असल्यास त्यांनी त्या वस्तू त्या लाकडी कपाटात आणून ठेवायच्या. त्यातील गरजेच्या वस्तू ज्यांना आवश्यक आहे त्यांनी त्या तेथून घेऊन जायच्या, असे आवाहन त्यांनी केले. त्याला दोन दिवसांपुर्वीच सुरुवात करण्यात आली असुन लोकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे धानुका यांच्याकडून सांगण्यात आले. हि संकल्पना देशातील पहिली संकल्पना ठरली असुन अनेक लोकं विनावापरातील वस्तू टाकून देतात अथवा त्या भंगारात टाकतात. काहीजण त्या गरीबांना देतात. परंतु, जुने साहित्य अनेक लोकं पुन्हा दुरुस्त करुन अल्प दरात विकतात. त्यामुळे विनावापराच्या वस्तू ज्यांना भंगारात विकायच्या नसल्यास त्यांनी त्या ‘नेकी कि दिवार’ मध्ये ठेवाव्यात, असे आवाहन करुन ज्यांना त्या वस्तूची गरज भासल्यास ते त्या वस्तू विनामुल्य घेऊन जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे अनेक लोकांच्या गरजा विनावापराच्या वस्तूंद्वारे पुर्ण होऊ शकतील, असा दावा त्यांनी केला आहे. शहरातील आणखी काही ठिकाणी हि संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.