मीरा रोड : भार्इंदर पूर्वेच्या प्रभाग ५ मध्ये सोमवारी रात्री एका इमारतीत भाजपाचे चारही उमेदवार बैठकीनिमित्त प्रचाराला गेले असता पैसे वाटण्याच्या संशयावरून अन्य पक्षाचे उमेदवार व रहिवासी मोठ्या संख्येने जमल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी चारही भाजपा उमेदवारांना पोलीस ठाण्यात नेले व मंगळवारी पहाटे समज देऊन सोडून दिले.नर्मदानगरच्या वैशाली इमारतीमध्ये रात्री उशिरा भाजपाचे चार उमेदवार मेघना रावल, राकेश शाह, वंदना पाटील व मुन्ना सिंह हे सोसायटीची बैठक घेऊन पैसे वाटप करत असल्याची कुणकूण काँग्रेस, राष्ट्रवादी, बविआ, शिवसेना, अपक्षांना लागली. काही वेळातच वैशाली इमारतीजवळ मोठ्या संख्याने जमाव जमला. घटनास्थळी पोलिसांचा मोठा ताफा आला. पालिकेचे आचारसंहिता पथकही आले; परंतु जमाव संतप्त झाल्याने भाजपाचे चारही उमेदवार इमारती मध्येच लपून बसले. तर इमारतीतील आजारी वृद्ध महिलेसाठी भाजपाची रुग्णवाहिका मागवून चादरीत गुंडाळून महिलेला नेल्याने त्यातूनच पैसे बाहेर काढल्याची चर्चा सुरू झाली. अखेर पोलिसांनी भाजपाच्या चारही उमेदवारांना बाहेर काढून नवघर पोलीस ठाण्यात नेले.दरम्यान, भाजपा उमेदवार रात्रीउशिरा प्रचार, बैठकांसाठी फिरुन पैसे वाटतात असा आरोप अन्य पक्षांकडून केला गेला. पोलीस व पालिका बघ्याची तसेच भाजपाधार्जिणी भूमिका घेतल्याचा आरोप करत निषेध केला. भाजपा उमेदवारांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाºयांनी मोठी गर्दी केली. शिवाय भाजपाचे पदाधिकारी - कार्यकर्तेदेखील जमले. खासदार राजन विचारे यांनीही पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त करत कारवाईची मागणी केली.१० वाजल्यानंतर प्रचार करणे वा पैसे सापडणे आदी बाबी आचारसंहिता पथकाच्या अखत्यारित असून त्यांनी फिर्याद दिली तर गुन्हा दाखल करू अशी भूमिका पोलिसांनी घेतली. पोलिसांनी इमारतीतील रहिवाशांकडे विचारणा केली असता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासंदर्भात सोसायटीची बैठक होती असे सांगितले. भाजपा उमेदवार हे बैठकीला आले होते; पण आम्हाला पैसे वाटलेले नाही असा खुलासा रहिवाशांनी केला. अखेर पहाटे चारच्या सुमारास चौघांनाही पोलिसांनी समज देऊन सोडले.उमेदवारांची धावपळमहापालिका निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहचला असतानाच स्वातंत्र्य दिनाचा फायदा उचलण्यासाठी नेत्यांसह उमेदवारांची धावपळ झाली. प्रभागातील सोसाट्यांमध्ये होणाºया झेंडावंदनासाठी नेते आणि उमेदवार आवर्जून हजेरी लावत प्रचारही करताना दिसत होते.>मतदारांना दिले प्रशिक्षणभार्इंदर : यंदा पालिका निवडणुकीत एकूण २४ प्रभागात सरासरी २१ उमेदवार उभे आहेत. एका प्रभागातून चार उमेदवारांना मते द्यायची असल्याने मतदारांमध्ये मतदानावेळी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. मतदारांनी गोंधळून न जाता विनासायास मतदान करावे, यासाठी प्रशासनाने सोमवारपासून प्रात्यक्षिकासह मतदारांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. मतदारांना ‘अ, ब, क, ड’ या जागांच्या वर्गवारीनुसार मतदान करायचे आहे. यात मतदारांची चूक होऊन त्यांनी चारवेळा मतदान न केल्यास त्यांनी दिलेले मत रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारांना मतदानयंत्राद्वारे मतदान करताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी निवडणूक प्रशासनाने प्रत्येक प्रभागातील मतदारांना मतदान यंत्राद्वारे पसंतीच्या चार उमेदवारांना मतदान कसे करायचे त्याचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सांगितले.>‘भार्इंदर केमिस्ट वेल्फेअर’वर गुन्हा दाखल कराभार्इंदर : भाजपाचे मंत्री गिरीश बापट यांचा १४ आॅगस्टला भार्इंदर केमिस्ट वेल्फेअर असोशिएनतर्फे जीसीसी क्लब येथे सत्कार झाला. हा प्रकार आमिष दाखवणारा असून आचारसंहिता भंग केली असल्याचा दावा करत असोसिएशनवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मीरा-भार्इंदर संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष शिवमूर्ती नाईक यांनी राज्य निवडणूक आयोग, स्थानिक पोलिसांकडे केली आहे. आर्थिक प्रलोभनांना बळी पडुन भार्इंदर केमिस्ट वेल्फेअर असोसिएनचे भार्इंदर अध्यक्ष अरविंद जैन, सचिव भवानी गाडोदिया व मीरा रोड अध्यक्ष पंकज सिम्पी, सचिव सुनील गुप्ता यांनी निमंत्रण पत्रिका काढून सर्व सदस्यांना सत्कार समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यात आचारसंहिता भंग प्रकरणी असोसिएशनवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नाईक यांनी केली आहे.>मीरा रोडमध्ये आज काँग्रेसची सभा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची उद्या मीरा रोड येथील शांतीनगर सेक्टर २ व १० मध्ये सायंकाळी जाहीर सभा होणार आहेत. तत्पूर्वी चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ ६ आॅगस्टला फोडला होता. चव्हाण यांची ही दुसरी प्रचारसभा असून पुढील दोन दिवसांत काँग्रेसचे काही दिग्गज नेतेही प्रचारासाठी येणार असल्याचे सांगितले जात आहे.
पैसे वाटण्याच्या संशयावरून भार्इंदर पूर्वेत तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 3:05 AM