सदानंद नाईक, उल्हासनगर : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भगवान भालेराव यांची उल्हासनगर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली. गेल्या वेळी भालेराव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी लढून तिसऱ्या क्रमांकाचे मते घेतली होती.
उल्हासनगर रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राहिलेले भगवान भालेराव यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांची भेट घेऊन उमेदवारी मागितली होती. मात्र शेवटच्या क्षणी ओमी कलानी यांची शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यावर, भालेराव यांचा भ्रमनिरास झाला. त्यांनी मनसेच्या स्थानिक पदाधिकार्यासह राज ठाकरे यांची रविवारी भेट घेऊन समर्थकासह मनसेत प्रवेश केला. ठाकरे यांनी भालेराव यांची उल्हासनगरसाठी उमेदवारी घोषित केली.
भालेराव महापालिकेचे उपमहापौर राहिले असून आंबेडकरी जनतेत त्यांचे वजन आहे. २०१९ साली त्यांनी अपक्ष म्हणून उल्हासनगर मतदारसंघातून निवडणूक लढवून तिसऱ्या क्रमांकाचे ८ हजार पेक्षा जास्त मते मिळविली होती. भालेराव यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी पराभूत झाल्याचे बोलले जाते. मनसेने भालेराव यांची उमेदवारी घोषित केल्याने, उल्हासनगर मतदारसंघात कलानी, आयलानी व भालेराव अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहर विकास कागदावर असल्याने, नागरिकांना आयलानी-कलानी ऐवजी तिसरा पर्याय हवा आहे. त्यामुळे नागरिक माझा विचार निश्चित करतील. असा विश्वास भालेराव यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.