ठाणे : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला ठाणे जिल्ह्यात मंगळवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. संपूर्ण दिवसभरात जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलकांनी निदर्शने केली; पण शांततेत. कुठेही दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्यासाठी दमदाटी करण्याचे, किंवा आंदोलकांनी कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती हातात घेण्याचे प्रकार घडले नाहीत. जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन, नंतर सोडून दिले. बंदमुळे जनजीवन फारसे प्रभावित झाले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा, कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात ठाणे : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदच्या आवाहनाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात शेतकरी नांगर आणि ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी ३० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये महिलांचाही समावेश होता. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश चिटणीस, ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. ‘किसानो के सम्मान मे, राष्ट्रवादी काँग्रेस मैदान मे’, ‘कृषिकायदे रद्द करा’ आदी घोषणा देत कार्यकर्त्यांनी कृषी कायद्याच्या प्रतींची होळी केली. पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमारे ३० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, या आंदोलनात पंजाब येथील शेतकरी लखबीरसिंह गिल हे ‘मी शेतकरी आहे, दहशतवादी नव्हे’ अशा आशयाचे फलक घेऊन सहभागी झाले होते. एक शेतकरी चक्क नांगर घेऊन आंदोलनात आला होता. यावेळी आनंद परांजपे यांनी सांगितले की, केंद्र सरकारने तीन कृषी कायदे पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर केले आहेत. त्याविरोधात अनेक शेतकरी दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत आंदोलनाला बसले आहेत. हे नवीन कायदे लागू झाल्यास कृषी क्षेत्रही भांडवलदारांच्या हातात जाईल. त्यामुळे हा कायदा रद्द करून अन्नदात्याला न्याय द्यावा. अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
बाजारात संमिश्र प्रतिसादठाणे : भारत बंदला ठाण्याची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांभळी नाका येथील भाजी मार्केटमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. या वेळी मोजक्याच भाजी विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली होती.जांभळी नाका येथील भाजी मार्केटमध्ये संमिश्र प्रतिसादाचे चित्र पाहायला मिळाले. या वेळी दुकाने खुली ठेवलेल्या भाजी विक्रेत्यांना विचारल्यावर त्यांनी पाठिंबा असल्याचे सांगितले. मात्र दुकाने खुली ठेवली होती. आम्ही सकाळी दुकाने बंद केली होती, आता सुरू केल्याचे काही भाजी विक्रेत्यांनी सांगितले. काहींना प्रश्न विचारल्यावर लगेचच दुकाने बंद करण्याचा दिखावा केला. ज्यांच्याकडे माल शिल्लक होता, त्यांनी तो माल विकण्यासाठी दुकाने खुली केली होती. परंतु आमच्या मार्केटचा भारत बंदला पूर्ण पाठिंबा आहे, असे जिजामाता फळभाजी सेवा संघाचे खजिनदार जिटेश गुप्ता यांनी सांगितले.
डोंबिवलीत प्रभाव नाही डोंबिवली : शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’च्या आंदोलनाचा कोणताही परिणाम मंगळवारी शहरात दिसला नाही. सार्वजनिक वाहतूक, दुकाने तसेच दैनंदिन व्यवहार सकाळपासून सुरळीतपणे सुरू असल्याने नोकरदारांना दिलासा मिळाला.दुकाने व वाहतूक जबरदस्तीने बंद करायला लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश साहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे यांनी दिले होते. त्यामुळे शहरात कोणीही सक्ती केली नाही. सर्वत्र कायदा सुव्यवस्था राखली गेल्याचे निदर्शनास आले. शहरातील शिवसेना प्रणीत व लालबावटा रिक्षा युनियनने बंदला जाहीर पाठिंबा दिला होता, मात्र या संघटनांच्या रिक्षाचालकांनीही रिक्षा रस्त्यावर आणून व्यवसाय केला. दरम्यान, लालबावटा रिक्षा युनियनने काही वेळ केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निदर्शन केली.बंदच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी चौकात मोठा पोलीस बंदोबस्त होता. खासगी क्षेत्रातील नोकरदार वर्ग नेहमीप्रमाणे बसने कामाच्या ठिकाणी गेला. पूर्व व पश्चिमेत भाजीमार्केट, दुकाने, डेअरी, हॉटेल्सही सुरळीत सुरू होती. प्रत्येक रिक्षाथांब्यावर दोन पोलीस सकाळपासून सायंकाळपर्यंत तळ ठोकून होते. तर, महिला पोलिसांनी काही धार्मिक स्थळांना भेट देत सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
कल्याणमध्ये महाविकास आघाडीचे आंदोलनकल्याण एपीएमसीत बंद केंद्र सरकारचा शेतकरी कायदा हा शेतकरीविरोधी असल्याने मंगळवारी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात बंद पाळला गेला. मात्र, काही फुलविक्रेते व भाजीपाला विक्रेत्यांनी रस्त्यावर किरकोळ विक्री केली.nबंदला रिक्षा-टॅक्सी महासंघाने पाठिंबा दिला होता. त्याचा फलकही कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा स्टॅण्डवर लावला होता. मात्र रिक्षा सुरू होत्या.कल्याण : शेतकरी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदला कल्याणमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरात विविध ठिकाणी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चक्कीनाका येथे आंदोलन झाले. त्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी वंडार पाटील, रमेश हनुमंते, प्रल्हाद भिल्लारे, पारसनाथ तिवारी, सचिन बोराडे, प्रज्ञा चव्हाण, मोरेश्वर तरे आदी सहभागी झाले होते. शेतकरीविरोधी कायदा रद्द करावा तसेच केंद्र सरकारच्या विरोधात या वेळी घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदार दीपक आकडे यांना निवेदन दिले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मनोज नायर यांनीही कल्याण पूर्वेत आंदोलन केले. तेथे १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.कल्याण पश्चिमेला शिवसेनेचे अरविंद मोरे व राष्ट्रवादीचे प्रल्हाद भिल्लारे यांनी महात्मा फुले ते शिवाजी चौकापर्यंत दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. कल्याण पूर्वेत शिवसेनेचे पदाधिकारी शरद पाटील व हर्षवर्धन पालांडे यांनी दुकानदारांना बंद पाळण्याचे आवाहन केले. नेवाळी नाक्यावर शेतकऱ्यांच्या वतीने शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी आंदोलन केले. तेथे रास्ता रोकोचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी १३ शिवसैनिकांना ताब्यात घेतले. कल्याण पूर्वेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यात कांचन कुलकर्णी, शकील खान, मनीष देसले, भूपेश सिंग, पॉली जेकब, जाफर खाटीक आदी सहभागी झाले होते.