- जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील व्यापारी भरत जैन हत्याकांडातील एक आरोपी नीलेश भोईर हा मनसुख हत्याकांडातील कथित आरोपी निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडे काही काळ चालक म्हणून नोकरीला होता. मनसुख हत्याकांडातून प्रेरणा घेऊन नीलेशने जैन यांची हत्या करून त्यांचा मृतदेह कळवा खाडीत टाकला का, याचा आता तपास केला जात असल्याची माहिती ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
जैन यांच्या हत्याकांडामध्ये अतुल मिश्रा हा सूत्रधार असला तरी यातील अन्य एक साथीदार नीलेश भोईर हा आरोपी सचिन वाझे यांच्याकडे तसेच निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या एका निकटवर्तीयाकडे चालक म्हणून काही काळ होता. मनसुख यांना ज्याप्रमाणे रस्सीने गळा आवळून खून केल्यानंतर त्यांच्या तोंडावर रुमाल बांधून मुंब्रा येथील खाडीत फेकण्यात आले, अगदी तसेच जैन यांचाही गळा आवळून खून केल्यानंतर त्यांचे हातपाय बांधून कळवा खाडीत फेकले होते. मात्र, या सर्वच बाबींची आता पडताळणी सुरू असून भोईर हा वाझे यांचा चालक असण्याशी या प्रकरणाचा संबंध नसल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. मात्र, पडताळणी सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. परंतु अन्य एका अधिकाऱ्याने या वृत्ताला नाव उघड न करण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे. जैन हत्याकांडात सुरुवातीला सुभाष सुर्वे, नंतर कल्याणमधून बळवंत चोळेकर याला अटक केली. तर उत्तर प्रदेशातून अतुल मिश्रासह दोघांना अटक केली.