मुरलीधर भवार, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : मणिपूरहून निघालेल्या राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या ठाणे जिल्ह्यातील मुक्कामाचे ठिकाण होते भिंवडीतील सोनाळे गाव. या गावातील मैदानावर गांधी येण्यापूर्वीच लहानसे गाव वसवले गेले. यात्रा सुरू झाल्यापासून ६२ ठिकाणी हे गाव वसवले गेले. गांधी यांच्यासोबत पहिल्या दिवसापासून या यात्रेत सहभागी झालेले काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते अशा ३५० जणांचा मुक्काम मैदानावर होता. सोनाळे ग्राउंडला शुक्रवारी पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. सगळ्या बाजूंनी कडेकोट बंदोबस्त होता.
मैदानात ४७ कंटेनर व्हॅन असलेल्या केबिन आधीच दाखल झाल्या होत्या. कंटेनर व्हॅनमध्ये एसी, पंखा आणि झोपण्याची व्यवस्था आहे. हँगर टेंट उभारण्यात आले होते. टेंटमध्ये चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली जाते. राहुल गांधी तेथे आले. व्हॅनमध्ये फ्रेश झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
राहुल गांधी यांनी मणिपूरपासून यात्रेला सुरुवात केली. दररोज १३० किलोमीटरचा प्रवास करून ते अखेरच्या मुक्कामी आले. गांधी पहाटे उठल्यावर व्यायाम करतात. त्यांची व्यवस्था पाहणाऱ्या फलज किडवाई यांनी सांगितले की, गांधींच्या यात्रेत सहभागी झालेल्यांचा मोठा काफिला आहे. दरराेज एक छोटे गाव वसवले जाते. मणिपूरपासून ते भिवंडीपर्यंतच्या यात्रेत ६२ ठिकाणी मुक्काम करण्यात आला.
शुक्रवारी संध्याकाळी नाश्त्यात व्हेज सॅण्डविच होते. त्यासोबत दही पापडी चाट आणि कलिंगड मिल्क शेक, चहा-कॉफी, टोमॅटो सूप होते. रात्री डाळभात, चपाती, भाजी, सलाड असा बेत होता. गांधींसह सर्वांचे खाद्यपदार्थ सारखेच असतात. कंटेनर व्हॅन आधी सीआरपीएफच्या जवानांकडून तपासली जाते. व्हॅनच्या चारही बाजूने ग्रीन शेड तयार केले होते.
भिवंडीशी निगडित आठवणी जाग्या झाल्या
भिवंडीत १९८२ साली धार्मिक दंगल झाली होती. तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भेट दिली होती. २०१४ साली राहुल गांधी यांनी भिवंडीत प्रचार सभा घेतली होती. त्यांच्या भाषणातील मुद्द्याविरोधात न्यायालयात दावा दाखल झाल्यावर ते भिवंडीत आले होते. आता यात्रेच्या निमित्ताने त्यांची भेट इंदिरा गांधींच्या आठवणी ताज्या करणारी ठरली.
शेलार ग्रामस्थांनी दिले शुभेच्छापत्र
राहुल गांधी यांची यात्रा शुक्रवारी भिवंडीत दाखल होण्यापूर्वी शहराच्या वेशीवर असणाऱ्या शेलार ग्रामपंचायतच्या हद्दीत शेलार ग्रामस्थांनी गांधी यांची रस्त्यावर भेट घेतली. वृद्ध महिला व चिमुरडीसोबत गांधी यांनी हात मिळवला. ग्रामस्थ अमोल तपासे यांनी शुभेच्छांचे पत्र गांधी यांना दिले.
राहुल गांधी यांचा मुंबई दाैरा
राहुल गांधी यांच्या या यात्रेची सुरुवात शनिवारी सकाळी १०:३० वाजता कौसा येथून होईल. इंडिया आघाडीचे ठाणे जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी यात्रेत सहभागी असतील. यानिमित्ताने शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मारकाला ते पुष्पहार अर्पण करणार आहेत. भारत जोडो न्याय यात्रेनिमित्ताने काँग्रेसचे नेते राहुल गांधी ठाणे, कळवा, मुंब्रा भागात येणार आहेत. यानिमित्ताने काँग्रेसने ठाण्यात मोठ्या प्रमाणात फलकबाजी केली आहे. तर राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा शहरात फलक उभारले आहेत. कळवा येथे आल्यानंतर राहुल गांधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला, तर कोर्ट नाका येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करतील. यात्रा जांभळीनाका येथे आल्यानंतर त्यांची एक चौकसभा होईल. त्यानंतर ठाण्यातील एका सभागृहात ते माध्यमांसोबत संवाद साधणार असल्याचे सूत्रांतर्फे सांगण्यात आले.
रमजानचे उपवास असतानाही हजारोंनी केले राहुल यांचे स्वागत
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ शुक्रवारी भिवंडीत दाखल झाली तेव्हा काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते व भिवंडीतील नागरिक या यात्रेमध्ये सहभागी झाले. सध्या मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असतानाही काँग्रेसचे शेकडो मुस्लीम कार्यकर्ते रोजा (उपवास) असतानाही गांधी यांच्या स्वागताला भर उन्हात हजर होते. भिवंडी-वाडा मार्गाने ही यात्रा सायंकाळी वंजारपट्टी नाका येथून शहरात दाखल झाली. शहरातील मनपा मुख्यालयासमोर आनंद दिघे चौकात गांधी यांची चौकसभा झाली. खुल्या जीपमध्ये उभे असलेल्या राहुल गांधी यांनी टी-शर्ट, पँट असा पोशाख परिधान केला होता. ते हात उंचावून लोकांना अभिवादन करत होते. काही मंडळींसोबत हस्तांदोलन करीत होते. त्यांच्यासोबत जीपवर माजी मंत्री नसीम खान व खा इम्रान प्रतापगढी होते.
धूळ, घाण असलेल्या रस्त्यावर फुले टाकली
राहुल गांधी यांची यात्रा आनंद दिघे चौकात दाखल झाली तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर फुले टाकली होती. एरवी या रस्त्यावर धुळीचे व घाणीचे साम्राज्य पाहायला मिळते. यात्रेमुळे रस्ते स्वच्छ करण्यात आले होते.