Bharat Jodo Yatra: "राहुल गांधींनी भारत जोडण्यापेक्षा त्यांचा खिळखिळा झालेला पक्ष आधी जोडावा", रामदास आठवलेंचा सल्ला
By धीरज परब | Published: November 21, 2022 12:36 PM2022-11-21T12:36:38+5:302022-11-21T12:37:20+5:30
Ramdas Athawale: राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे . लोकं त्यांना बघायला येतात . भारत जोडण्यापेक्षा त्यांनी आपला खिळखिळा झालेला काँग्रेस पक्ष जोडावा. भारत जोडून ठेवण्यासाठी मोदीजी व आम्ही आहोत.
-धीरज परब
मीरारोड - राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे . लोकं त्यांना बघायला येतात . भारत जोडण्यापेक्षा त्यांनी आपला खिळखिळा झालेला काँग्रेस पक्ष जोडावा. भारत जोडून ठेवण्यासाठी मोदीजी व आम्ही आहोत. भारत तुटू देणार नाहि त्यामुळे राहुल गांधी यांनी चिंता करू नये असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मीरारोड येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन च्या भूमिपूजन प्रसंगी लगावला.
आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी मीरारोडच्या हाटकेश भागातील सरकारी जमिनीवर होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन रविवारी रामदास आठवले यांच्या हस्ते पार पडले. जवळपास १ एकर जागेवर हे भवन होणार असून तीन मजली सांस्कृतिक भवन इमारतीमध्ये मंगल कार्यालयसाठी मोठा हॉल , विपश्यना हॉल , प्रदर्शन हॊल , ग्रंथालय , मिनी थिएटर , कॉन्फरन्स रूम , कॅफे एरिया , लिफ्ट अशा सर्व सुविधा असतील. ४ रूम भवनात असतील. विद्यार्थ्यांना येथे अभ्यास करता येणार आहे.
भूमिपूजन वेळी आमदार गीता जैन , आयुक्त दिलीप ढोले , माजी महापौर निर्मला सावळे व ज्योत्स्ना हसनाळे , शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजू भोईर , माजी नगरसेवक नीला सोन्स, विक्रमप्रताप सिंह , दयानंद शिर्के, कमलेश भोईर , आरपीआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर , रमेश गायकवाड , महेश शिंदे आदींसह नागरिक , पालिका अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.
भूमिपूजन नंतर भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजण केले होते . राज्य शासनाने या साठी १५ कोटींचा निधी मंजूर केला असून १ कोटी आ . सरनाईकांचा आमदार निधी तर ११ कोटी महापालिका खर्च करणार आहे . एकूण २७ कोटींचा खर्च यासाठी येणार आहे. या ठिकाणी आंबेडकरांचा पुतळा उभारण्याचे प्रस्तावित आहे . तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांनी आंबडेकर भावनास व त्यासाठी १५ कोटींच्या निधीची मंजुरी देताना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असे भवन व्हावे यासाठी तरतूद केली असल्याची माहिती आ . सरनाईक यांनी दिली.
सर्व सुविधांनी सज्ज असे हे भवन येणाऱ्या पिढींना प्रेरणा देईल. याठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राबरोबरच बँकिंग बाबतचे व स्वयं रोजगाराचेही प्रशिक्षण दिले जावे , असे प्रतिपादन आठवले यांनी केले.
सरकार जाईल असे सुप्रिया सुळे , संजय राऊत म्हणतात. पण हे सरकार जाण्यासाठी नाही तर परत परत येण्यासाठी आहे. शिंदे - फडणवीस यांचे सरकार आणण्या मध्ये सर्वात सरनाईकांचा मोठा वाटा आहे . त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते . मी सुद्धा उद्धवजींना पुन्हा पुन्हा सांगत होतो कि तिकडे तुम्हाला जास्त काळ राहता येणार नाही.
मंत्री कसे व्हायचे हे मला माहिती आहे म्हणून मी मंत्री झालो . कधी कोणाला पाठिंबा द्यायचा ते माहिती आहे . मी सत्ता मिळवण्याचे राजकारण करतो , बाबासाहेबांचे राजकारण करतो . एकट्याला शक्य नसेल तर दुसऱ्याशी मैत्री करून सत्तेत आले पाहिजे . त्यामुळे एकही खासदार नसताना मी मंत्री. अनेकांची मंत्री पदे जातात पण तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मी मंत्री कायम आहे असे आठवले म्हणाले.
बाळासाहेबांना २०११ साली त्यांच्या वाढदिवशी मातोश्रीवर भेटायला गेलो होतो . यावेळी त्यांनी शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र आली तर महाराष्ट्रात सत्ता आल्या शिवाय राहणार नाही असे सांगितल्याची आठवण आठवलेंनी करून दिली .