मीरारोड - अतिरेकी वा शत्रू सैन्याशी लढणाऱ्या लष्करा नक्षलवाद्यांशी लढणारे महाराष्ट्र पोलिसांचे सी ६० कमांडो सुद्धा देशासाठीच लढत आहेत. त्यामुळे शहीद सी ६० कमांडो व कुटुंबीयांना सुद्धा लष्करी जवानांप्रमाणेच देशात सन्मान मिळावा यासाठी गडचिरोली पोलिसांच्या सी ६० च्या ५ कमांडोंचे पथक दुचाकी वरून भारत भ्रमण करत आहेत. बुधवारी सदर पथकाचे काशीमीरा भागात पोलिसांनी स्वागत केले.
नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या कमांडो ६० युनिटचचे ५ कमांडो गडचिरोली वरून २५ डिसेंबरपासून दुसऱ्या टप्प्यातील भारत भ्रमणावर निघाले आहेत. गडचिरोली येथील शौर्य स्थळ स्मारक येथून किशोर खोब्रागडे, अजिंक्य तुरे, देवा आडोळे, रोहित गोंगळे आणि राहुल जाधव या पाच कमांडोच्या ‘गडचिरोली पोलीस शहीद सन्मान यात्रे ला ४ दुचाकी वरून सुरवात झाली.
आतापर्यंत मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात असा प्रवास करत मंगळवारी रात्री हे काशीमीरा भागात मुक्कामी थांबले. बुधवारी सकाळी हे पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पुणे, नागपूर मार्गे पुन्हा गडचिरोलीला परतणार आहे. २४ दिवसात सुमारे ७ हजार किलोमीटर इतका प्रवास दुचाकीवरून ते पूर्ण करणार आहेत.
बुधवारी सकाळी काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्यासह गडचिरोली पोलिसात काम केलेले पोलीस निरीक्षक सपन बिश्वास, सहायक पोलीस निरीक्षक टिकाराम थाटकर, पोलीस उपनिरीक्षक धनंजय गायकवाड आदींनी ह्या सी ६० च्या कमांडोचे स्वागत करत त्यांची विचारपूस केली. त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
लष्करी जवानांप्रमाणेच नक्षलीं सोबत लढताना शहीद होणाऱ्या सी ६० कमांडोना सुद्धा देशात सन्मान मिळावा, कमांडोंची वीरगाथा देशाला कळावी ह्यासाठी ४ टप्प्यात भारत भ्रमण यात्रा सुरु केली आहे. सी ६० कमांडो अतिशय खडतर परिस्थितीत देशासाठी नक्षलींसोबत जीवाची पर्वा न करता लढत आहेत. यात्रेचा पहिला टप्पा उत्तर भारताचा पूर्ण केला असून सध्या पश्चिम भारतची यात्रा सुरु आहे. नंतर दक्षिण भारत व पूर्व भारताची यात्रा करणार आहोत. देशात सुमारे ४५ हजार किमीची ही दुचाकी यात्रा असणार आहे असे यात्रेतील कमांडो यांनी सांगितले.