भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून नव्या प्रभागरचनेची सोडत २७ एप्रिल रोजी काढण्यात येणार होती. मात्र, आता ही सोडत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात येणार असल्याचे संकेत पालिकेच्या नगरसचिव विभागातील सूत्रांनी दिले. शहरात निवडणूकपूर्व राजकीय वातावरण तापू लागले असून पक्षांतराला चांगलेच उधाण येण्याची चिन्हे दिसत आहेत. पक्षांतराच्या प्रतीक्षेत असलेल्यांची नजर प्रभागरचना जाहीर होण्याकडे लागली आहे. राज्य निवडणूक आयोगामार्फत प्रभागरचना जाहीर होणार आहे. त्याबाबत, आयोगाने यापूर्वी निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार, २७ एप्रिलला प्रभागरचनेची सोडत होणार होती. आयोगाने ११ एप्रिलपर्यंत प्रभागरचना निश्चित करण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा १७ एप्रिलला आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करणे अपेक्षित होते. परंतु, प्रत्यक्षात पालिकेने २१ एप्रिलला प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा आयोगाला सादर केल्याने आयोगाने त्याच्या मान्यतेला होणारा विलंब हेरून सोडत पुढे ढकलली. (प्रतिनिधी)
भार्इंदर प्रभागरचना सोडत लांबणार?
By admin | Published: April 27, 2017 11:40 PM