- नारायण जाधव ठाणे : मुंबई शहर आणि वसई-विरार प्रदेशाच्या विकासात मैलाचा दगड ठरणा-या खाडीवरील बहुप्रतीक्षित भार्इंदर-वसई पुलासाठी अखेर एमएमआरडीएला मुहूर्त सापडला आहे.या पुलावर एमएमआरडीए १०८१ कोटी ६० लाख रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील अंतर तब्बल ३० किमीने कमी होणार आहे. त्याचा फायदा आठ लाख रहिवाशांसह मुंबई-गुजरात प्रवास करणा-या लाखो वाहनचालकांना होणार आहे. खाडीवरील ५ किमी लांबीचा हा पूल ३०.६ मीटर रुंद असा सहा पदरी असणार आहे. पुलाच्या बांधकामात खारफुटी आणि मिठागरांसह पाणजू बेटांवरील काही रहिवाशांचा अडथळा होता. त्यावर मात करून एमएमआरडीएने त्याच्या बांधकामासाठी निविदा मागविल्या आहेत. निविदा आल्यावर त्याबाबत निर्णय होणार आहे.हा पूल दोन्ही बाजूंना १४.३ मीटर रुंदीत तीनपदरी लेनद्वारे भार्इंदर आणि नायगांवदरम्यानच्या पश्चिम रेल्वे पुलाच्या समांतर तो बांधला जाणार आहे. तसेच तो पुढे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ८ला जोडला जाणार आहे.>वेळेसह कोट्यवधींच्या इंधनाची बचत होणार : सध्या मीरा-भार्इंदरहून वसई येथे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ हाच एकमेव पर्याय आहे. काशिमीरा मार्गे वसईला जाण्यासाठी घोडबंदर रस्त्याने जेएनपीटीहून गुजरातकडे जाणाºया हजारो कंटेनरच्या वाहतुकीमुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूककोंडीला सामारे जावे लागते. यामुळे भार्इंदर ते वसई हे ३९ किमीचे अंतर कापण्यासाठी एक तास १७ मिनिटे लागतात. मात्र, हा पूल झाल्यास हे अंतर तब्बल ३० किमीने कमी होणार असून, भार्इंदर-वसई ये-जा करण्यासाठी अवघी १० ते १५ पंधरा मिनिटे लागणार आहेत. यामुळे एक तासाची बचत होऊन कोट्यवधींच्या इंधनाची मोठी बचत होणार आहे.>विलंबामुळे खर्च वाढला२०१३मध्ये प्रस्तावित केलेल्या या पुलाचा खर्च ३०० कोटी रुपये गृहीत धरला होता. परंतु, विलंबामुळे तो आता दीड हजार कोटींवर जाणारआहे. मिठागरांसह ३.४४ हेक्टर खारफुटीचा अडथळा आणि पाणजू बेटावरील रहिवाशांच्या विरोधामुळे त्यास विलंब झाला आहे. या पुलामुळे समुद्रातील मासेमारीसह इतर पर्यावरणाला हानी पोहोचेल, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.>पाणजू बेटास जोडणारवसई नजिकच्या पाणजू बेटास या पुलामुळे अॅक्सेस मिळणार आहे. यासाठी ६०० मीटर लांबीच्या आणि साडेआठ मीटररुंद असा दोन रॅम्पद्वारे हा पूल जोडण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. यामुळे गैरसोय दूर होईल.
भार्इंदर-वसई अंतर ३० किमीने कमी करणाऱ्या १०८२ कोटी खर्चाच्या खाडीपुलास मुहूर्त सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 5:22 AM