- राजू काळेभार्इंदर- भुयारी वाहतूक मार्गातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या गुरु नामक बारसह तेथील सुमारे ४ दुकाने व टपऱ्यांवर पालिकेने शनिवारी कारवाई केली. यात बारवर विशेष मेहेरनजर दाखवित त्याचा संसार लगतच्या एसटी थांब्यासाठी बांधण्यात आलेल्या इमारतीच्या गच्चीवर बेकायदेशीर हलविण्यात आल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या थांब्यासाठी पालिकेने एसटीला दिर्घ मुदतीच्या भाडेपट्यावर जागा दिली आहे. पूर्वी या इमारतीच्या गच्चीवर पत्र्याची शेड बांधण्यात आली नव्हती. त्यामुळे इमारतीच्या तळमजल्यावर पावसाळ्यात पाण्याची गळती सुरु झाली. ती रोखण्यासाठी अलिकडेच त्यावर पत्र्याचे छप्पर टाकण्यात आले आहे. या शेडमुळे बारच्या संसाराला डोक्यावर छप्पर मिळाल्याची चर्चा सुरु झाली आहे. या बारवर न्यायालयीन स्थगिती असताना तडजोडीने त्यावर कारवाई करण्यात आल्याची चर्चा तेथील दुकानदारांत सुरु झाली असून त्याचा संसार उघड्यावर पडु नये, यासाठी पालिकेने एसटी इमारतीच्या गच्चीवर तो ठेवण्यात आल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले. तसेच याच गच्चीवर तात्पुरता बार सुरु करावा, अशी सुचनाही काही महाभागांनी दिल्याने एसटी कर्मचारी व प्रवाशांत प्रचंड नाराजी पसरली आहे. अशातच या इमारतीलगत पालिकेच्या स्थानिक परिवहन विभागाची चौकी बांधण्यात आली होती. ती सुद्धा पालिकेने तोडली. त्यामुळे विभागाचा कारभार एसटीच्याच इमारतीतुन हाकावा, अशी सूचना कर्मचाऱ्यां देण्यात आल्याचंही सुत्राकडुन सांगण्यात आले. यामुळे परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांमध्येदेखील असंतोष पसरला असुन दाद कोणाकडे मागावी, अशा संभ्रमावस्थेत ते आहेत. तसेच पालिकेच्या कारभाराविरोधात काही बोलल्यास काढल्यास संभाव्य कारवाईला घाबरुन कोणीही बोलण्यास तयार नाहीत. पालिकेच्या कारवाईत बारचा रस्त्यावर आलेला संसार सार्वजनिक वास्तुत ठेवणे बेकायदेशीर असुन तेथेच बार सुरु झाल्यास प्रवाशांना तेथील मद्यपींचा त्रास होईल. मात्र यात महिला प्रवाशांची मोठ्याप्रमाणात कुचंबना होण्याची शक्यता असल्याने पालिकेची ती हिटलरशाही ठरणार आहे, असं एसटी प्रवासी अजय सुर्वे यांनी म्हंटलं आहे.
पालिकेतील अधिकारी सत्ताधारी पक्षाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या दबावामुळे आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत आहेत. त्यामुळेच सार्वजनिक वास्तुत बारचा संसार हलविण्यात आला आहे. हा प्रकार गैर असून आयुक्तांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरीत कारवाई करुन बारच्या वस्तू त्वरीत त्या इमारतीतुन हटवाव्यात, असं माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी म्हंटलं आहे.