ठाणे : जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी मीरा-भार्इंदर पालिकेचे विरोधी पक्षनेते लियाकत अली शेख यांना ठाणे पोलिसांनी अटक केली असून त्यांना ३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.मीरा-भार्इंदर येथील नवघर परिसरातील रहिवासी महेश परशू पाटील यांची याच भागात जमीन आहे. त्यांची आजी जनीबाई यांचे १९७५ मध्ये निधन झाले. त्यांच्या निधनाच्या १० वर्षांनंतर १९८५ साली लियाकत शेख यांनी त्यांच्याकडून जमीन विकत घेतल्याची कागदपत्रे तयार केली. २००८ साली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जमिनीच्या खरेदीविक्रीची कागदपत्रे सादर करून त्याची नोंदणी करून घेतली. दरम्यान, महेश पाटील हे जमिनीच्या कागदपत्रांची पाहणी करत असताना पाच ते सहा एकर जमिनीची नोंद लियाकत शेख यांच्या नावावर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून नोंदणीचे दस्तावेज मिळवले असता फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार, महेश पाटील यांच्या तक्रारीवरून ठाणेनगर पोलीस ठाण्यात लियाकत शेख याच्यासह चार्लीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी लियाकत शेख यांना दोन दिवसांपूर्वी अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)
भार्इंदर विरोधी पक्षनेत्यास अटक "
By admin | Published: May 02, 2017 2:41 AM