लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गोड-तिखट पाणीपुरी, गरमागरम भुट्टा, पुरी भाजी अशा भारतीय पदार्थांपासून अगदी ठाण्यातील उपवनच्या तलावाचा मनसोक्त आनंद भारतात आलेल्या परदेशी पाहुण्यांनी लुटला आणि त्यांना ही चव भावली.भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी १२ देशांमधील २१ तरुण-तरुणींनी भारतीय कुटुंबाचा आठ दिवस पाहुणचार घेतला. लायन्स क्लबच्या यूथ एक्सचेंज कार्यक्रमातून क्लबने त्यांना ही संधी उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमातून भारतातील ‘अतिथी देवो भव’ची अनुभूती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. भारतातील वास्तव्याचा अनुभव आम्हाला आयुष्यात नेहमी प्रेरणादायक ठरेल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.लायन्स क्लबच्या डिस्ट्रीक्ट ३२३१ ए-२ च्या वतीने यूथ एक्सचेंज कार्यक्रमातून ब्राझील, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, इटली, मेक्सिको, मॅसिडोनिया, रशिया, स्वित्झर्लंड, तुर्कस्तान आदी देशांमधील तरु ण भारतात आले होते. या मुलांची ठाणे, मुंबई-पुण्यासह सोलापूर, जालना येथील कुटुंबाकडे आठ दिवस राहण्याची व्यवस्था होती.नवी दिल्ली, आग्रा, जयपूर, पुणे, उदयपूरमधील काही पर्यटनस्थळांनाही तरुणांनी भेटी दिल्या. भारतातील संस्कृतीची व पर्यटनस्थळांची ओळख करण्याबरोबरच युवा पिढीचे विचार लायन्स क्लबच्या सदस्यांपर्यंत पोचिवण्यासाठी यूथ एक्सचेंज हा कार्यक्र म सुरू करण्यात आला आहे. यंदा या कार्यक्र माला १५ जुलैपासून सुरु वात करण्यात आली होती. त्याचा नुकताच समारोप झाला आणि पाहुणे आपल्या देशी रवाना झाले.आम्हाला पाहुणे म्हणून आल्याचे कधीही जाणवले नाही. पहिल्यांदा ओळख झालेल्या भारतीय घरातील पाहुणचार आम्हाला भावला. त्यातून आम्हाला आदरातिथ्याचा एक धडा शिकता आला, असे ते म्हणाले.या कार्यक्र माला लायन्स क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर लायन हनुमान अगरवाल, व्हाईस डिस्ट्रीक्ट गव्हर्नर लायन के. जे. पॉल, लायन मनेश्वर नायक, यूथ एक्सचेंज चेअरपर्सन लायन सुधीर सक्सेना आदी उपस्थित होते. या वेळी तरु णांचा पाहुणचार करणाºया कुटुंबांबरोबर यूथ एक्सचेंज समितीचाही गौरव करण्यात आला.स्मार्ट सिटीच्या दिशेनेवाटचालीची प्रशंसाभारतातील काही शहरांचा स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू होत असलेल्या प्रवासाबाबत तरुणांनी प्रशंसा केली. पुणे महापालिका मुख्यालयात स्मार्ट सिटी प्रकल्पाचे त्यांनी सादरीकरण पाहिले. तसेच पाश्चात्य देशातील शहरांप्रमाणे होणाºया वाटचालीबाबत आनंद व्यक्त केला. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी त्यांना माहिती दिली. त्यावेळी काही तरु णांनी सूचनाही केल्या. त्याची दखल महापौरांनी घेतली असल्याचे लायन्स क्लबने सांगितले.भारतीय पदार्थ पाहून आश्चर्य व्यक्त करीत हे पदार्थ रुचकर असल्याचे मेक्सीकोची लायने हीने सांगितले. तलावपाळीला भुट्टा खाण्याचा मनमुराद आनंद नेदरलँडच्या अॅना हिने घेतला. पाणीपुरीची चव घेतल्यानंतर एक नवीन पदार्थ खाल्याचे समाधान जर्मनीच्या फिलीप याने व्यक्त केले.
परदेशी पाहुण्यांना भावली ठाण्याची तिखट पाणीपुरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 6:19 AM