भार्इंदर : मीरा- भार्इंदर परिसरात महापालिकेने चालवलेल्या विविध प्रकारच्या बांधकामांवर पालिका अभियंत्यांचे लक्ष नसून कामात वापरलेल्या बांधकाम साहित्याची गुणवत्ता, कामाची शास्त्रोक्त पद्धत यावर नागरिकांमधून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे संगनमत असल्याने कामात भ्रष्टाचार होऊन निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याने नागरिकांच्या पैशांचा दुरूपयोग केला जात असल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत.सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली असून त्या दरम्यान मीरा- भार्इंदर महापालिकेच्या विविध विकासकामांची बांधकामेही घाईगडबडीत उरकली जात आहेत. एकीकडे पालिका अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याचे सांगत दैनंदिन कामांकडे दुर्लक्ष करत आहेत . तर अनेकांना निवडणुकीच्या कामानिमित्त ठाण्यात खेपा माराव्या लागत आहेत. परंतु महापालिका क्षेत्रात पालिकेच्या खर्चातील रस्ते, गटार आदी विविध बांधकामे दिवसरात्र सुरू असताना त्यावर नियंत्रण मात्र पालिका अधिकाऱ्यांचे दिसत नाही. कारण अभियंते निवडणूक कामात असल्याचे सांगत असून दुसरीकडे कामाचा दर्जा, वापरले जाणारे बांधकाम साहित्य, कामाची पद्धत या कडे कानाडोळा केला जात आहे .काही भागात गटाराचे बांधकाम सुरू असताना तेथे सांडपाणी साचले असूनही त्यामध्येच काँक्रिटचा माल टाकून काम उरकले जात आहेत. गटाराच्या पाण्यामध्येच काम सुरू असताना जागेवर मजूर गंज चढलेल्या सळ््या कशातरी बांधून काम करत आहेत.शहरात अशा पद्धतीने सर्रास कामे सुरू असताना लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माजी नगरसेवक मिलन म्हात्र आणि रोहित सुवर्णा, माहिती अधिकार कार्यकर्ते ईरबा कोनापुरे, आम आदमी पक्षाचे सुखदेव बिनबंसी आदींनी केला आहे .नागरिकांनीही निकृष्ट दर्जाची कामे होऊन त्यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे . निविदा आणि टक्केवारीमुळे नागरिकांचा पैसा भ्रष्ट मार्गाने नेते व अधिकाऱ्यांच्या खिशात जात असल्याचा संताप व्यक्त केलाआहे.
भाईंदर पालिका : विकासकामांमध्ये निकृष्ट साहित्य, नागरिकांच्या पैशाचा दुरूपयोग होत असल्याचा केला आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 1:00 AM