मीरारोड - ऑर्केस्ट्रा बारच्या आड सर्रास बारबालांचा अश्लील नाच चालूच असून भाईंदर पूर्वेच्या मिड लाईफ बार मधून ग्राहकांसह ११ जणांना पोलिसांनी पकडले आहे. धाडीत पोलिसांनी ५८ हजार ६०० रुपयांची रोख जप्त केली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव सह उमेश पाटील केशव शिंदे , विजय निलंगे, रामचंद्र पाटील, सम्राट गावडे, अश्विनी भिलारे यांच्या पथकाने मिळालेल्या माहिती नंतर भाईंदर पूर्वेला रेल्वे स्थानक समोर असलेल्या मिड लाईफ ऑर्केस्ट्रा बारवर धाड टाकली. पोलिसांना सदर ऑर्केस्ट्रा बारमध्ये बारबाला ह्या बंदी असून देखील नृत्य करत असल्याची व्हिडीओ क्लिप बातमीदारा मार्फत मिळाली होती. बारमध्ये ७ बारबाला आढळून आल्या. पोलिसांनी बार मधील कर्मचाऱ्यांसह ग्राहकांना पकडले. बुधवारी नवघर पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान ऑर्केस्ट्रा बारमध्ये कलाकार म्हणून ८ जणांना ठेवण्याची परवानगी आहे. त्यामुळे बारवाले हे सर्रास ८ पैकी ७ गायिका म्हणून तरुणींना ठेवतात. वास्तविक गायिकांच्या नावाखाली बारबाला सक्रिय असून त्या मूळात कलाकार नाहीत. त्यांना गाणी म्हणता येत नसल्याने रेकॉर्ड केलेली गाणी बार मध्ये वाजवली जातात. गायिकेच्या नावाखाली बारबाला ह्या तोकड्या कपड्यात अश्लील हावभाव करत नाचताना आढळून येतात असे पोलीस सूत्रांनी सांगितले.