लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - शहर स्वच्छतेच्या पुरस्काराचा तोरा मिरविणाऱ्या मीरा-भाईंदर महापालिकेचा अस्वच्छतेचा बुरखा खुद्द महापालिका आयुक्तांच्या पाहणीतच उघड झाला आहे. भाईंदर पूर्वेच्या भाजी मार्केट गल्ली व औद्योगिक वसाहतीतील नेहमीच गलिच्छ आणि बकाल असलेली अवस्था ‘वॉक विथ कमिश्नर’ उपक्रमाअंतर्गत आयुक्तांनी पाहिली आणि साफसफाईचे आदेश दिले.
स्वच्छ भारत अभियानअंतर्गत दरवर्षी स्वच्छतेत क्रमांक पटकावला, कोणता तरी पुरस्कार मिळाला म्हणून मीरा-भाईंदर महापालिका स्वतःची पाठ थोपटून घेत असते. शहर कचराकुंडीमुक्त असल्याचा दावा पालिका करते. परंतु दुसरीकडे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग व अस्वच्छता पाहायला मिळाली. तसेच शहर हे उघड्यावर शौचमुक्त असल्याचा दावा पालिका करते, मात्र आजही शहरात मोठ्या प्रमाणात उघड्यावरच शौचाला लोक बसत आहेत. त्यामुळे दरवर्षी पालिकेचा स्वच्छ शहरांत नंबर कसा येतो ? व पुरस्कार कसे मिळतात? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. शहरातील कचऱ्याचे साम्राज्य व अस्वच्छता याचे विदारक दृश्य भाईंदर पूर्वेच्या औद्योगिक वसाहत व खारीगाव भाजी मार्केट मार्गावर नेहमीच बघायला मिळते. त्याचा प्रत्यय स्वतः आयुक्त दिलीप ढोले यांना, त्यांनीच सुरू केलेल्या 'वॉक विथ कमिश्नर' उपक्रमाअंतर्गत बुधवारी आला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ व डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त जीत मुठे, मारुती गायकवाड व संजय शिंदे, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे व दीपक खांबीत, सहायक आयुक्त सचिन बच्छाव, अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण, प्रभाग अधिकारी दामोदर संखे, उद्यान अधीक्षक हंसराज मेश्राम, स्वच्छता अधीक्षक राजकुमार कांबळे, जनसंपर्क अधिकारी राजकुमार घरत यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.
औद्योगिक परिसरात कारखान्यातील तसेच खारीगाव भाजी मार्केट भागात भाज्या, प्लास्टिक व अन्य कचऱ्याचे ढीग रस्त्यावर साचलेले होते. गटारे तुंबलेली व अस्वच्छ होती. रस्त्यांवर खड्डे व कचरा, चिखल पसरलेला होता. पदपथ - रस्त्यावर बेकायदा हातगाड्या व फेरीवाल्यांचे तसेच व्यावसायिकांचे अतिक्रमण सुद्धा जागोजागी दिसून आले. परिसराची ही दुरवस्था पाहून आयुक्तांनी परिसरात स्वच्छता करण्याचे आदेश दिल्यानंतर, सफाई कर्मचाऱ्यांनी परिसरातील कचरा उचलून नेला.