मीरारोड - भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानकास जोडणारा स्कायवॉक दुरुस्तीच्या कामासाठी ३१ मे पर्यंत बंद केला गेला असून पश्चिमरेल्वेने तसा फलक लावला आहे. त्यातच पदपथावर पालिकेचे पे एन्ड पार्क, रस्त्यावरील बेकायदा पार्किंग, रस्त्यावरील बेकायदा रिक्षा गॅरेज मुळे हजारो नागरिकांना जिवाच्या भीतीने रस्त्यातून चालावे लागत आहे.
भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानकात चालत जाणाऱ्या नागरिकांची सोया व्हावी म्हणून स्कायवॉक बांधण्यात आला . सदर स्कायवॉक वरून रोज सकाळ पासून रात्री पर्यंत हजारो प्रवासी ये-जा करत होते. कारण रेल्वे स्थानका जवळ असलेले फेरीवाले, दुचाकी व रिक्षा पार्किंग, बस स्थानक आणि होणारी गर्दी पाहता पायी जाणाऱ्या नागरिकांना स्कायवॉक सोयीचा ठरला.
मात्र सदर स्कायवॉकच्या दुरुस्ती कामासाठी पश्चिम रेल्वेने ३१ मे पर्यंत लोकांना स्कायवॉक ये - जा करण्यास बंद केला आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना मुख्य रस्त्यातून चालावे लागत आहे. कारण या ठिकाणी स्कायवॉक खाली असलेले पदपथावर महापालिकेने दुचाकी पार्किंग चे कंत्राट दिलेले आहे. दुचाकी पदपथ व रस्त्यावर उभ्या केल्या जात असताना येथे बेकायदा गॅरेज रस्त्यावर चालवली जातात. बेकायदा रिक्षा , टेम्पो आदी वाहने उभी केली जातात. बस स्थानक जवळ सुद्धा रिक्षा लागतात. शिवाय स्टेशनच्या जिन्याकडे जाणाऱ्या मार्गावर फेरीवाले, दुचाकी व रिक्षा पाचवीला पुजलेल्या असतात.
त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालण्याची तसेच फेरीवाले, दुचाकी व रिक्षांच्या गर्दीतून मार्ग काढण्याची कसरत करावी लागत आहे. स्कायवॉक बंद झाल्याने पालिका आणि वाहतूक पोलिसांनी नागरिकांना चालण्यासाठी रस्ता - पदपथ व रेल्वे स्थानक परिसर मोकळा करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.