मीरारोड - भाईंदर पश्चिमेस बुधवारी झालेल्या जन संवाद कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडल्या . यावेळी पोलीस , महसूल , पालिका आदी अधिकाऱ्यांनी नागरिकांची तक्रार जाणून घेत काहींवर तोडगा काढला .
भाईंदर पश्चिमेस डॉ . बाबासाहेब आंबेडकर नगरभवन सभागृहात बुधवारी आमदार गीता जैन यांच्या प्रयत्नांनी जन संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी आ . जैन सह अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख , पालिका उपायुक्त मारुती गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त शांतीलाल जाधव , वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई व मुगुट पाटील , वाहतूक शाखेचे निरीक्षक रमेश भामे, माजी सभापती व भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड . रवी व्यास , माजी नगरसेवक महेंद्रसिंह चौहान, ओमप्रकाश गाडोदिया , सुरेश खंडेलवाल , जयेश भोईर , प्रतिभा पाटील , गृहनिर्माण संस्थाचे पदाधिकारी , नागरिका उपस्थित होते .
अभिहस्तांतरण प्रक्रिया होऊन सुद्धा जमीन मालकी गृहनिर्माण संस्थेचे नाव सातबारा नोंदी प्रलंबित असल्याच्या काही तक्रारी होत्या . त्यावर महसूल विभागाने लवकर फेरफार करून नाव लावण्याचे आश्वस्त केले . वाहतूक व पार्किंग समस्या गंभीर बनली असून पालिकेने पार्किंगचे धोरण अजून अमलात आणले नाही . त्यामुळे पार्किंग समस्या आणि कारवाई बद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली . महापालिका कागदपत्रांची पडताळणी करत नाही वर कोणतीच सूचना न देता कारवाई साठी येत असल्याचे एका नागरिकाने मांडले . विकास आराखडा बाबत लोकांच्या तक्रारी जास्त होत्या . जुन्या इमारतींचा पुनर्विकास , अभिहस्तांतरण ची जुनी समस्या सोडवण्याची मागणी झाली . काही मोकळ्या जागा वा कोपरे हे व्यसनी - गर्दुल्ले यांचे अड्डे बनल्याच्या मुद्द्यावर पोलिसांनी अश्या ठिकाणी गस्त वाढवावी असे ठरले . तक्रारींबाबत संबंधित अधिकाऱ्यांबरोबर लवकरात लवकर प्रत्यक्ष जागेचा पाहणी दौरा करणार असल्याचे आ. जैन यांनी सांगितले.