पंकज पाटील अंबरनाथ : ऊन, पाऊस, थंडीची तमा न बाळगता अनेक वर्षे सायकलवर भेळ विकणारे विश्वास शिंगोटे यांची भेळ लोकप्रिय झाली आहे. शिंगोटे हे सरकारी कार्यालयात येताच त्यांच्याकडून भेळ घेण्यासाठी गर्दी होते. फिरती देशी भेळ म्हणून ते नावारूपाला आले आहेत. दिवसभर भेळ विकून शिंगोटे हे आपला प्रपंच सांभाळत आहेत. नोकरी गमावल्यावर न डगमगता त्यांनी सुरू केलेला व्यवसाय आजही ते जिद्दीने सांभाळत आहे.अहमदनगर जिल्ह्यातील बदगी येथील शिंगोटे १९६६ च्या सुमारास मुंबईत नोकरीच्या शोधात आले आणि स्थायिक झाले. त्याकाळी अंबरनाथमध्ये स्वस्तिक कंपनी नावारूपाला आली होती. तेथे कुणालाही रोजगार मिळत असे. शिंगोटे यांच्या भावाने विश्वास यांना त्या कंपनीत नोकरी मिळवून दिली. मात्र, १९८७ मध्ये कंपनी बंद पडली. आता पुढे काय करायचे, असा यक्षप्रश्न उभा ठाकला. कपाळावर गंधाचा टिळा, गळ्यात तुळशीच्या माळा, असा साधा पेहराव असणाऱ्या शिंगोटे यांनी नोकरी मिळत नाही म्हणून न डगमगता एखादा परवडणारा व्यवसाय का करू नये, असा विचार केला. त्यांनी भेळीचा व्यवसाय करण्याचा निर्धार केला. त्यावेळी जवळ जास्त पैसे नसल्याने जागा कशी घ्यायची आणि व्यवसाय कसा करायचा, हा प्रश्न होताच. तरीही, प्राप्त परिस्थितीवर मात करून शिंगोटे यांनी सायकलीचा तोडगा काढला आणि सायकलवर भेळविक्रीचा व्यवसाय सुरू केला.हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी असा व्यवसाय करणाऱ्यांना त्याबाबत विचारणा केली, पण माहिती द्यायला कुणीही तयार होईना, याची खंत शिंगोटे यांना सतावू लागली. याचवेळी हातगाडीवर चुरमुरे, शेव, कांदा, मिरचीची भेळ विकण्यास प्रारंभ केला. नंतर, सायकलला पिशव्या अडकवून भेळीचा व्यवसाय सुरू केला. टेस्टी भेळीमध्ये साधे चुरमुरे, शेव, शेंगदाणे, टोमॅटो आणि कुरकरीतपणा येण्यासाठी शिंगोटे फोडणीचे चुरमुरे वापरतात. नगरपालिका, तहसीलदार कार्यालयांबाहेर सायकल उभी केली की, भेळ खाण्यासाठी खवय्यांची रांग लागते. व्यवसायातून जास्त कमाई होत नसली, तरी दोनवेळचे पोटभर जेवण मिळते, असे त्यांनी सांगितले. शिंगोटे यांची मुलेही हा व्यवसाय करतात.
सायकलवर भेळ विकून कुटुंबाचा प्रपंच, नोकरी गेल्यावर व्यवसाय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 1:42 AM