- नितीन पंडितभिवंडी : भिवंडीत विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. सेना-भाजपची युती झाल्यामुळे एकतर्फी वाटणारी भिवंडी पूर्व व पश्चिम मतदारसंघांची निवडणूक बंडखोरीमुळे रंगली आहे. भाजपचे शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी काँग्रेसशी घरोबा केला आहे. त्यामुळे युतीतर्फे निवडणूक लढणाऱ्या शिवसेनेचे आमदार रूपेश म्हात्रे यांना शेट्टी यांचे आव्हान असणार आहे.भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे रूपेश म्हात्रे यांच्यासमोर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करून याआधीच बंडखोरी केली होती. शुक्र वारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शेट्टींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली होती. त्यासाठी त्यांनी शक्तिप्रदर्शनही केले. मात्र, दुपारी १२ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल होताच काँग्रेसने दिल्ली येथे अखेरच्या पाच नावांची घोषणा केली, ज्यामध्ये संतोष शेट्टी यांच्या नावाचाही समावेश होता. ते समजताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेले संतोष शेट्टी आता काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत. २०१४ ची निवडणूक भाजपकडून लढवणाºया संतोष शेट्टी यांचा अवघ्या ३३९३ मतांनी रूपेश म्हात्रे यांनी पराभव केला होता. त्यामुळे युती झाल्यामुळे एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता चांगलीच रंगणार आहे.दरम्यान, काँग्रेस - राष्ट्रवादी - समाजवादी यांची आघाडी असल्याने भिवंडी पश्चिम मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात आला. त्यामुळे भिवंडी पूर्व मतदारसंघावर समाजवादीने दावा केला होता. मात्र, ऐन वेळेस काँग्रेसने शेट्टी यांना उमेदवारी दिल्याने समाजवादीच्या वतीने रईस शेख यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे काँग्रेस - समाजवादीच्या युतीतदेखील मिठाचा खडा पडला आहे. काँग्रेसने दाखवलेल्या या अविश्वासामुळे समाजवादी भिवंडी पश्चिममध्ये एमआयएमशी जवळीक साधणार आहे. त्यामुळे एमआयएमची ताकददेखील वाढणार असून पश्चिममध्ये काँग्रेसच्या उमेदवारासाठी ते कडवे आव्हान असणार आहे.राष्ट्रवादीतही असंतोषकाँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानंतर राष्ट्रवादीसाठी भिवंडी शहरातील एकतरी जागा द्यावी, अशी जोरदार मागणी होती. मात्र, काँग्रेसने भिवंडी पश्चिममधून काँग्रेसचे शहराध्यक्ष शोएब गुड्डू यांना, तर भाजपचे शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांना भिवंडी पूर्वमधून काँग्रेसची उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीत असंतोष निर्माण होऊन या पक्षाचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला आहे.
भिवंडीत भाजप - राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची बंडखोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 1:06 AM