भिवंडी : पटेल कम्पाउंड येथील जिलानी इमारत दुर्घटनेस मालक, भोगवटादर व पालिकेचे संबंधित अधिकारी दोषी असल्याचे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी हा अहवाल आयुक्त डॉ. पंकज आशिया यांना सादर करण्यात आला. ही इमारत बेकायदा बांधण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. इमारत सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी मालक, भोगवटाधारकांवर होती, मात्र त्यांनी घेतली नाही. पालिका अधिकाऱ्यांकडूनही हलगर्जीपणा झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.सरकारच्या निर्देशानुसार मार्च व एप्रिलमध्ये धोकादायक, अतिधोकादायक इमारतींना नोटिसा देऊन त्यांची वर्गवारी सी १ व सी २ अशी करणे आवश्यक होते. मात्र तशी शहनिशा पालिका अधिकाऱ्यांनी केली नव्हती. तसेच या इमारतीचे सी १ व सी २ असे वर्गीकरणही अधिकाºयांनी केले नव्हते. जिलानी इमारत धोकादायक ठरविल्यानंतर ही इमारत निर्मनुष्य करण्यासाठी पोलीस प्रशासनाला कोणतेही पत्र दिले नसल्याची बाब या अहवालात स्पष्ट झाली आहे. त्यामुळे चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात इमारत मालकांबरोबरच भोगवटादार व मनपाचे संबंधित अधिकारीही दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात अशी दुर्घटना घडू नये यासाठी धोकादायक इमारतींसाठी नियमावलीही चौकशी समितीने प्रशासनास सादर केली आहे.२१ सप्टेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास ही इमारत कोसळून ३८ जणांचा बळी गेला असून २५ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेस जबाबदार धरत मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांना तडकाफडकी निलंबित करून या दुर्घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.बांधकाम परवानगी नव्हती दिलीया चौकशी समितीत उपायुक्त डॉ. दीपक सावंत , शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, सहायक संचालक नगररचना प्रल्हाद होगे पाटील यांचा समावेश होता. ही इमारत १९७५ मध्ये ग्रामपंचायत अस्तित्वात असतांना बांधण्यात आली असे स्पष्ट केले आहे मात्र या इमारतीस बांधकाम परवानगी दिल्याचे दिसून येत नाही असेही समितीने म्हटले आहे.
जिलानी इमारत दुर्घटना: मालक, पालिका अधिकारी दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:50 AM