-नितिन पंडीत
भिवंडी: शहरातील धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाउंड येथे तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाले असून जखमींवर स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिलानी इमारत असे या धोकादायक इमारतीचे नाव असून सुमारे 40 कुटुंब या इमारतीत राहत होते. मात्र दोन भागांमध्ये असलेल्या या इमारतीच्या पश्चिमेकडील भाग 24 सदनिकांचा एक भाग कोसळला आहे . त्यामुळे इतर अनेक जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे.
दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी इमारत मालक सय्यद अहमद जिलानी यांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 337 , 338 , 304 ( 2 ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . घटनास्थळी मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, जिल्हाधीकारी राजेश नार्वेकर यांनी धाव घेत तातडीच्या मदतीसाठी प्रयत्न सुरु केले.
फातमा जुबेर बबू ( वय 2 वर्ष मुलगी ) , फातमा जुबेर कुरेशी ( वय 8 वर्ष मुलगी ) , उजेब जुबेर - ( वय 6 वर्ष मुलगा ), असका म. आबीद अन्सारी- ( वय 14 वर्ष मुलगी ) , अन्सारी दानिश म. अलिद अंसारी ( वय 12 वर्ष मुलगा ) सिराज अ. अहमद शेख ( वय 28 वर्ष पुरुष ), जुबेर कुरेशी - ( वय 30 वर्ष पुरुष ) , कौसर शेख ( वय 27 वर्ष महिला ) व इतर असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
तर अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी ( वय 18 वर्ष पुरुष ), मोमीन शमिउहा शेख ( वय 45 वर्ष पुरुष ) , कौंसर सीराज शेख ( वय 27 वर्ष - महिला ) रुकसार जुबेर शेख- ( वय 25 वर्ष महिला ) , आवेश सरोजुद्दीन अन्सारी ( वय 22 वर्ष पुरुष ), जुलैखा म. अली. शेख ( वय 52 वर्ष महिला ), उमेद जुबेर कुरेशी ( वय 4 वर्ष मुलगा ) व इतर अशी या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत.
विशेष म्हणजे तीन मजल्यांची हि इमारत1983 च्या सुमारास बनविण्यात आली असून सुमारे 37 वर्ष जुनी असल्याने महापालिकेने हि इमारत धोकादायक ठरवून या इमारतीला नोटीस देखील दिली होती. घटनास्थळी अग्निशमन दल , ठाणे येथील टिडीआरएफ व एनडीआरएफचे जवान दाखल झाले असून सध्या याठिकाणी बाचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत 19 जखमींना बचावकार्य पथकाने ढिगाऱ्याखालून बाहेर काढले असून अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असून बचावकार्य सुरुच आहेत. दरम्यान दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बचाव कार्यात अडथळा आला मात्र टिडीआरएफ व एनडीआरएफ व अग्निशमन दलाच्या जवानांनी भर पावसातही आपले बचाव कार्य सुरूच ठेवले होते.
घटनास्थळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली असून दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या परिवाराला प्रत्येकी पाच लाख रुपये मदत व जखमींवर मोफत उपचार करण्याची घोषणा केली आहे . तर राज्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन भिवंडीत क्लस्टर योजना राबविणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले . तर भिवंडी अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या धोकादायक व अनधिकृत इमारती असून नागरिक या धोकादायक इमारतींमध्ये नागरिक आपले व आपल्या परिवाराचा जीव धोक्यात घालून राहत आहेत त्यामुळे भिवंडीत क्लस्टर योजना लागू करण्यात यावी अशी मागणी आपन सुरुवातीपासूनच करत आहोत अशी प्रतिक्रिया भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी दिली आहे . तसेच भिवंडी महापालिका प्रशासन धोकादायक इमारतींना केवळ नोटीस देऊन आपले हात झटकण्याचे काम करत आहे तर सरकार अशा धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या राहण्यासाठी इतर कोणतीही व्यवस्था करत नाही अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
रात्री तीन वाजेच्या सुमारास बाजूच्या सदनिकेत राहणाऱ्या मित्राने आवाज देत इमारतीला तडे गेल्याचे सांगितले तेव्हा बघितले असता लादीला व भिंतीला मोठ्या भेगा पडलेल्या दिसल्या. आम्ही तातडीने आजूबाजूच्या सदनिकेत रहिवासींचे दरवाजे ठोठावत त्यांना उठवून इमारत खाली करण्याचा सल्ला दिला. अनेक जण खाली गेलेही मात्र क्षणातच होत्याच नव्हते झाले आणि इमारत खाली कोसळली सुदैवाने मी व माझी पत्नी वाचलो अशी प्रतिक्रिया या इमारतीत राहणारे रहिवासी शारीफ अंसारी यांनी दिली आहे .