भिवंडी : वळपाडा येथे तीन मजली इमारत कोसळल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. दुर्घटनेच्या ठिकाणी बचाव कार्य करण्यासाठी निघालेल्या वाहनांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. मानकोली अंजूर फाटा तसेच भिवंडी- ठाणे व मानकोली- ठाणे रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. या वाहतूककोंडीतून मार्ग काढताना बचाव पथकाला अक्षरश: कसरत करावी लागली. शहरातील अंतर्गत रस्त्यांवरदेखील या वाहतूककोंडीचा परिणाम झाला होता. अंजुरफाटा, धामणकर नाका व कामतघर परिसरातदेखील मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती.
इमारत दुर्घटनेबरोबरच भिवंडीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळपासून धामणकर नाका येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयात सुरू होती. त्यामुळे धामणकर नाका परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. या वाहतूककोंडीचा फटका शहरातील अंतर्गत वाहतुकीला बसला.
वाहतूक अतिशय संथ गतीने पुढे सरकत होती. दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतराला तब्बल दीड ते दोन तास लागत होता. शनिवार, रविवार आणि सोमवार अशा तीन दिवस सलग सुट्या असल्याने मुंबई- नाशिक महामार्गावर खासगी वाहनांची मोठी गर्दी होती. त्यामुळे खारेगाव टोलनाका ते वडपाडापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली.
बघ्यांनी केली मोठी गर्दी एकीकडे घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाकडून अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते, तर दुसरीकडे घटनास्थळी बघ्यांनी हळूहळू गर्दी करायला सुरुवात केली. कोणी त्या ठिकाणाचे फोटो तसेच शूटिंग काढत होते, तर कोणी व्हिडीओ कॉलवर होते. यामुळे वाहतूककोंडीबरोबरच बचाव कार्यात अडथळा निर्माण होत होता. संध्याकाळी कामावरून सुटलेल्यांनीदेखील गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी तसेच स्थानिकांनी गर्दी करणाऱ्या या बघ्यांना हुसकावून लावले.
शेकडाे पोलिस तैनातपोलिस उपायुक्त परिमंडळ २ (भिवंडी सिटी) येथील पोलिस उपायुक्त, दोन सहायक पोलिस आयुक्त यांच्यासह सहा पोलिस ठाण्यांतील सहा वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्यासह पोलिस निरीक्षक आणि १०० च्या आसपास पोलिस कर्मचारी दुर्घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर ठाणे शहरातही पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसही मानकोलीपासून तैनात करण्यात आले होते.