- नितिन पंडीत
भिवंडी -भिवंडीत अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी करून पन्नास लाखांची रक्कम स्वीकारताना ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांना बुधवारी रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईने मनपा प्रशासनासह लोकप्रतिनिधींमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
भिवंडी शहरातील मौजे कामतघर हद्दीतील महसूल विभागाच्या नावे सर्व्हे क्रमांक ४२/अ/३ ही ६० गुंठे ही जागा आहे . परंतु सदर जागा भिवंडी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या ताब्यात शेतकऱ्यांच्या हिता साठी देण्यात आली होती, परंतु या जागेवर व्यवसायिक गाळे उभारण्यात आले होते . हे गाळे पालिकेने रस्ता रुंदीकरणात तोडले असता भिवंडी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने त्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून ६७ गाळे उभारण्यात आले असून या बाबत काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांनी महानगरपालिका व महसूल विभागाकडे तक्रार करून सर्व अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
या बाबत दुकान मालकांनी मध्यस्थी करून कारवाई न करण्या बाबत विनंती केली असता सिद्धेश्वर कामूर्ती यांनी राजकुमार चव्हाण यांच्याकडे त्यांच्या मालकीचा फार्म हाऊस नावे करून द्यावा अथवा दोन कोटी रुपये देण्याची मागणी केली असता ५० लाख रुपयां मध्ये तडजोड झाली .व त्याबाबत राजकुमार चव्हाण यांनी लाच लुचपत प्रतिबंधक ठाणे विभागा कडे तक्रार केली असता या विभागाने सापळा रचून पद्मानगर भाजी मार्केट येथे सिद्धेश्वर कामूर्ती यांना रंगेहात पकडण्यात आले आहे . याप्रकरणी स्थानिक शहर पोलीस ठाण्यात जबाब व गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.