भिवंडी : भिवंडीच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत घोडेबाजाराला बळी पडून पक्षाशी दगाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या १८ नगरसेवकांचे पद कायमचे रद्द करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयात भेट घेऊन केली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले. भिवंडीच्या महापौर व उपमहापौरपदासाठी ५ डिसेंबर रोजी निवडणूक पार पडली.
काँग्रेस पक्षाचे महापालिकेत बहुमत असतानाही १८ नगरसेवकांनी पक्षादेश झुगारून कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवारास मतदान केले. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा दारु ण पराभव झाला. या घटनेमुळे काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली असून गटबाजीला उधाण आले आहे. त्यामुळे ही फूट रोखण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयात भेट घेऊन काँग्रेस पक्षाचा पक्षादेश झुगारून विरोधकांना मदत करणाºया १८ नगरसेवकांचे नगरसेवकपद तत्काळ रद्द करण्यासाठी कोकण आयुक्तांना आदेश देण्याची मागणी केली. काँग्रेसचे पालिका सभागृहनेते प्रशांत लाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ही मागणी केली. या भेटीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी फुटीर नगरसेवकांवर येत्या १५ दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती लाड यांनी दिली.
यावेळी गटनेते हालीम अन्सारी, नगरसेवक जाकीर मिर्जा, अबू सुफियान, जावेद खान, डॉ. जुबेर अन्सारी, अश्रफ खान ऊर्फ मुन्नाभाई खान आदींसह १५ नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान, कोकण आयुक्तांच्या आदेशावरून भिवंडी महापालिकेच्या नगरसचिव विभागाने काँग्रेस पक्षाचा आदेश झुगारणाºया १८ नगरसेवकांना नोटिसा बजावून १६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कोकण भवन येथे हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत.