राहुल गांधी यांना भिवंडी न्यायालयाचा दिलासा; गैरहजर राहण्यास न्यायालयाची परवानगी
By नितीन पंडित | Published: April 15, 2023 05:08 PM2023-04-15T17:08:26+5:302023-04-15T17:12:50+5:30
भिवंडी न्यायालयाकडून राहुल गांधी यांना दिलासा मिळाला आहे.
भिवंडी - भिवंडी न्यायालयात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल अवमान याचिकेच्या सुनावणी दरम्याना गैरहजर राहण्याची राहुल गांधी यांची विनंती भिवंडी न्यायालयाने काही अटीशर्ती ठेऊन मान्य केली आहे. त्यामुळे आता जोपर्यंत केस चालणार तोपर्यंत राहुल गांधींना भिवंडी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याची आवश्यकता नसून त्यांच्या वतीने वकील त्यांची बाजू मांडू शकतात.या खटल्याची पुढील सुनावणी ३ जून रोजी होणार असल्याची माहिती राहुल गांधी यांचे वकील अँड नारायणा अय्यर यांनी दिली आहे. त्यामुळे भिवंडी न्यायालयाकडून राहुल गांधी यांना दिलासा मिळाला आहे.
२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येस आर एस एस जबाबदार असल्याचे विधान केले होते.त्या विरोधात आर एस एस पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.या याचिकेच्या सुनावणीस कायम गैरहजर राहण्यासाठी राहुल गांधी यांच्या वतीने अँड नारायण अय्यर यांनी भिवंडी न्यायालयात न्यायाधीश वाडीकर यांच्या समोर अर्ज केला होता.
शनिवारी आदेश देताना न्यायालयाने पुढील सुनावणी पासून नियमित वकील उपस्थित राहतील, न्यायालयाला आवश्यक वाटेल त्यावेळी राहुल गांधी यांनी हजर राहावे या अटी वर राहुल गांधी यांची विनंती न्यायालयाने मान्य केली आहे. या अटीचा भंग झाल्यास हा आदेश रद्द होईल असे ही या आदेशात स्पष्ट केले असून या याचिकेची पुढील सुनावणी ३ जून रोजी होणार आहे. ही आमच्यासाठी महत्वाची बाब असून न्यायपालिकेवर आमचा पूर्ण विश्वास असून या लढाईत विजय आमचाच होईल अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांचे वकील अँड नारायण अय्यर यांनी दिली आहे.