भिवंडी दि.३० : पंचवीस वर्षापुर्वी रस्ता रूंदीकरणांत गेलेल्या जागेच्या बदल्यात पालिकेकडून पर्यायी जागा न मिळाल्याने जागा मालकाने भिवंडी दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता.या दाव्याप्रकरणी महानगरपालिकेच्या विधी विभागाकडून झालेल्या दिरंगाईने आज महानगरपालिकेवर जप्तीची पाळी आली.कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार कोर्टाच्या बेलीफने आयुक्त कार्यालयांतील खुर्चा,सोफा व संगणक जप्त केले आहे.शहरातील कासारआळी घर क्र.१,वाडा स्टॅण्ड येथे रामभाऊ रावण घाडगे यांचे किराणा दुकान होते.हे दुकान सन १९९२ साली पालिकेने रस्ता रूंदीकरणासाठी तोडले.त्याबदली पालिका प्रशासनाने घाडगे यांना एस.टी.स्थानकाजवळील पाण्याच्या टाकीजवळ ८ बाय १०फुटाची जागा दिली .ही जागा घाडगे यांनी स्वत: बांधल्यानंतर सन २००३साली ती पालिका प्रशासनाने तोडली.त्यामुळे त्यांनी रस्ता रूंदीकरणात गेलेल्या जागेबदली पर्यायी जागा मिळण्यासाठी पालिका प्रशासनास विनंती अर्ज केले.परंतू तत्कालीन मुख्याधिकारी,आयुक्त व विकास अधिकाºयांनी त्यांच्या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याने रामभाऊ घाडगे यांनी भिवंडी दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता.मात्र या दाव्याकडे पालिकेच्या विधी अधिकाºयांनी,नियुक्त वकील पॅनेलने दिरंगाई करीत दुर्लक्ष केल्याने भिवंडी कोर्टाने पालिकेतील फर्नीचर,पंखे व संगणक आदि वस्तू जप्त करण्याची आदेश दिले .या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरीता पालिकेत रघुनाथ पगारे व जे.एम.भामरे हे दोन बेलीफ आपल्या कर्मचा-यांसह आले होते.त्यांनी आयुक्त योगेश म्हसे यांची भेट घेऊन कोर्टाचे आदेश बजावले.त्यानुसार बेलीफ आणि कर्मचा-यांनी आयुक्त कार्यालयांतील दोन सोफे,खुर्च्या व संगणक जप्त करून कोर्टात नेले. या घटनेप्रकरणी आयुक्तांशी भेट घेतली असता त्यांनी ‘सदरची बाब ही सन १९९२सालातील आहे.या बाबत संबधितांनी माहिती दिलेली नाही.या संदर्भात दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.’असे सांगितलेकाही दिवसांपुर्वी काढलेल्या जाहीर निवेदनाद्वारे आयुक्त योगेश म्हसे यांनी नवीन १६ वकीलांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्या दरम्यान पालिकेवर झालेली ही जप्तीची कारवाई शहराच्या दृष्टीने भूषणावह नाही,अशा प्रतिक्रीया शहरातून उमटल्या.त्याचप्रमाणे ही जप्तीची कारवाई होई पर्यंत पालिकेचे वकील काय करीत होते? असा प्रश्न शहरवासीयांतून विचारला जात आहे.तसेच पालिकेतील प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी किती जबाबदारीने कामे करीत आहेत, हे कोर्टाच्या कारवाईने स्पष्ट झाले आहे.
भिवंडी कोर्टाची महानगरपालिकेवर जप्तीची कारवाई, कोर्टाच्या आदेशानुसार मनपाचे कार्यालयीन सामान जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 6:19 PM