भिवंडी : भिवंडी गुन्हे शाखेने अशा चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या ५ लाख ७९ हजार रुपये किमतीचे ४२ मोबाईलचा शोध घेऊन नागरिकांना गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांच्या उपस्थितीत बुधवारी मोबाईल परत करण्यात आले आहेत.
याबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांनी सांगितले की, चोरीस गेलेले व हरवलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमध्ये चोरीस गेलेल्या व हरविलेल्या मोबाईल फोनची माहिती संकलित करून, सी ई आय आर मोबाईल ॲप प्रणालीचा वापर करून अँपल,सॅमसंग,व्हीवो,ओप्पो,वन प्लस अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे एकुण ४२ मोबाईल शोधून काढण्यात यश मिळविले आहे. ते नागरिकांना परत करीत असताना अनेक नागरिकांनी मोबाईल हाती घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
माझा मोबाईल गहाळ झाला होता,तो पुन्हा मला मिळेल ही आशा मी सोडून दिली होती. काही दिवसांनी अचानक भिवंडी गुन्हे शाखेतून मला मोबाईल शोधून काढला असल्याचा फोन आला तो आज माझ्या हाती आहे याचा मला आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया बालकिशन तिरमदास यांनी व्यक्त करीत पोलिसांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले आहे.