भिवंडी : भिवंडी शहरातील कणेरी परिसरात धारदार शस्त्राने महिलेची हत्या झाल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी घडली होती. या महिलेच्या हत्येतील आरोपीस पकडण्यात मंगळवारी भिवंडी गुन्हे शाखेस यश आले आहे. मोनिश दिलीप जाधव वय १९ रा.कवाड ता.भिवंडी असे अटक आरोपीचे नाव आहे. भिवंडी महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत महिला सविता शिवराम साळवे वय ४२ रा. बौध्दवाडा, कणेरी ही कामावरून घरी आली असता तिने घराचा दरवाजा उघडताच घराच्या मागच्या बाजूकडील खिडकीतुन घरात प्रवेश करून लपुन बसलेल्या अज्ञात आरोपीने तिच्या गळ्यावर, हातावर धारदार शस्त्राने वार करून महिलेची हत्या करून आरोपी पसार झाला होता.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास शहर पोलिसांसोबत गुन्हे शाखा भिवंडी युनिट करीत होते.गुन्हे शाखा भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वा खाली सपोनि धनराज केदार, विजय मोरे, सपोनि प्रफुल्ल जाधव, पोउपनिरी रमेश शिंगे, सपोउपनि रविंद्र पाटील, राजेंद्र चौधरी, रामचंद्र जाधव, पोलीस कर्मचारी सचिन जाधव, सचिन सोनवणे, नरसिंह क्षीरसागर, भावेश घरत, प्रशांत बर्वे, रविंद्र साळुंखे या पोलीस पथकाने अज्ञात हत्या करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील तब्बल ७५ सीसीटीव्ही फुटेज तपासत तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारां मार्फत मिळालेल्या माहितीनुसार संशयित मोनिश जाधव यास ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने हत्या केल्याची कबुली दिलेली आहे.
आरोपीस भिवंडी शहर पोलीसांच्या ताब्यात दिल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. दरम्यान हत्या करण्यामागे नक्की कोणते कारण आहे हे अजून ही स्पष्ट झाले नसल्याने पोलीस त्या दिशेने चौकशी करून यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास गुन्हे शाखा करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी दिली आहे.