Crime News :भिवंडीत क्षुल्लक कारणावरुन पिता पुत्राने दोघांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केळी खरेदी करताना एक केळ अधिक घेतल्याने झालेलं भांडण इतके वाढले की दोन जणांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी रविवारी पोलिसांनी रस्त्यावर माल विकणाऱ्या एका व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला अटक केली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
भिवंडीत रस्त्यावर केळी विकणाऱ्या एका व्यक्तीकडून अधिकचे केळ घेतल्याने झालेल्या भांडणात दोघांचा जीव जाता जाता वाचला. एक केळे जास्त घेतल्याने विक्रेता आणि त्याच्या मुलाने दोघांवर रॉडने हल्ला करून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी केळी विक्रेता राम गुप्ता (४४) आणि त्याचा मुलगा संजय गुप्ता (१९) यांच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रविवारी दोघांनाही अटक केली आहे.
भिवंडीच्या कामतघर भागात राहणारा दोघे तरुण शनिवारी नारपोली इथल्या हनुमान मंदिर परिसरातून जात होते. त्यावेळी तिथे राम गुप्ता हा हातगाडीवर केळी विकत होता. त्यातील एका तरूणाने गुप्ताकडून अर्धा डजन केळी विकत घेतली. त्यावेळी तरूणाच्या मित्राने एक केळ जास्त घेतले. त्याचा राग आल्याने रामने त्याला धक्का दिला. यावर एका केळ्याचे पैसे अधिक घे परंतु धक्काबुक्की करू नको असे त्याने रामला खडसावले. त्यानंतर रामने दोघांना मोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
रामचा आवाज ऐकून त्याचा मुलगा संजय तिथे आला आणि तोही दोघांशी वाद घालू लागला. तितक्यात राग अनावर झाल्याने संजयने हातगाडी ठेवलेला लोखंडी रॉड बाहेर काढला आणि एका तरुणाच्या डोक्यात घातला. दुसरा तरुण त्याला वाचवायला गेला असता संजयने त्याच्याही डोक्यात रॉडने हल्ला केला. पुन्हा हल्ला करणार तितक्यात तरुणाने त्याचा हात पकडला. त्याच रागात संजयने तरुणाच्या हाताला चावा घेतला. पुन्हा इथे दिसल्यास गंभीर परिणामांना भोगावे लागतील, अशी धमकीही दोघांना गुप्ताने दिली.
या घटनेनंतर दोघांनी नारपोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा दोन्ही विक्रेत्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७,३२३,५०४, ५०६ अंतर्गत एफआयआर दाखल केला. रविवारी पोलिसांनी संजय आणि राम या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.