नितिन पंडीत -भिवंडी - भिवंडीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शेजारच्या महिलेने एका दोन वर्षीय चिमुरड्याचे दोन्ही हात आणि पाय तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा धक्कादायक प्रकार भिवंडीतील शेलार ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या मीठपाडा येथे गुरुवारी २६ मे रोजी घडला.
शेलार ग्रामपंचायत हद्दीतील मीठ पाडा या भागात मोलमजुरी करून आपल्या चिमुरड्यांची गुजराण करणारी महिला, सायंकाळी कामावर गेली असता शेजारी राहणाऱ्या एका निर्दयी महिलेने तिच्या दोन वर्षांच्या चिमुरड्यास अमानुष मारहाण केली. यात त्याचे दोन हात व पाय फ्रॅक्चर झाला आहे.
मोहम्मद कैफ सोनू शेख वय २ वर्ष, असे या चिमुरड्याचे नाव आहे. विशेष म्हणजे, गंभीर जायबंदी झालेल्या आणि तापाने फणफणलेल्या बालकाच्या आईकडे उपचारासाठी पैसेही नव्हते. यामुळे कळवा येथील शासकीय रुग्णालयातून ती जखमी बालकास घेऊन सोमवारी सायंकाळी भिवंडीत आली आहे. मात्र, या घटनेस पाच दिवस झाल्यानंतरही आणि भिवंडी तालुका पोलीस ठाण्याकडे स्टेशन डायरीमध्ये या घटनेची नोंद असतानाही, गुन्हा दाखल केला नाही.
चिमुरड्याची आई मुमताज शेख हिने दिलेल्या महितीनुसार ती मिठपाडा केडीया कंपाऊंड येथील झोपडपट्टीत आपल्या चार मुलांसह राहत असून ती विधवा असल्याने लग्न समारंभात भांडी धुण्याचे काम करून आपल्या चिमुरड्यांची भूक भागविते. गुरुवार २६ मे रोजी ती सायंकाळी आपल्या १२ व ७ वर्षांच्या मुलांच्या हाती दोन व दहा महिन्याच्या चिमुरड्यांना सोपवून कामावर गेली असता शेजारी राहणारी झरीना या महिलेने दोन वर्षांचा मोहम्मद कैफ आपल्या घरात आल्याचा राग मनात ठेवून त्यास बेदम मारहाण करीत त्याचे हात व पाय मुरगळले, अशी माहिती रात्री घरी आल्यावर मुमताज हिला तिची मुलगी मुस्कान हिने सांगितली.
यानंतर शुक्रवारी सकाळी मुमताज आपल्या चिमुरड्याला घेऊन भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात आली असता तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपी महिला झरीना हिला बोलावून, मुमताज हिच्या मुलाला प्रथम उपचारासाठी घेवून जाण्याचा सल्ला दिला. मुमताज हिने जखमी मोहम्मद कैफ यास प्रथम स्व आयजीएम रुग्णालय नेले असता, त्यांनी पुढील उपचारासाठी कळवा ठाणे रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले.
तेथे फॅक्चरवर उपचार सुरू असताना औषध व उपचार साहित्य बाहेरून आणण्यास सांगितल्याने गरीब मुमताज कडील पैसे संपल्याने मुमताज ही चिमुरड्यास घेऊन भिवंडीत सोमवारी सायंकाळी दाखल झाली. त्यावेळी मुलगा तापाने फणफणलेला होता आणि कण्हत होता.
या बाबत भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, या प्रकरणी महिला तक्रार घेऊन आली असता, स्टेशन डायरीला नोंद घेऊन आरोपी महिलेला बोलावून घेतले, परंतु मुलगा जखमी असल्याने त्याला आधी उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला दिला, असे पोलिसांनी सांगितले. तर कळवा पोलिसांनी आम्हाला अजुन कळवले नसल्याचे सांगत तालुका पोलिसांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
विशेष म्हणजे घटना घडून चार दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने तक्रारदार महिलेसह अनेकांनी संताप व्यक्त केला आहे .कळवा रुग्णालयात स्थानिक पोलिसांनी घटनेची नोंद करीत त्याची माहिती वेळीच भिवंडी तालुका पोलीस ठाण्यास का दिली नाही, असा प्रश्न उपस्थित होत असून भिवंडी तालुका पोलीस ठाण्यातील यंत्रणेचा भोंगळपणा या घटनेनंतर समोर आला असून यावर वरिष्ठ काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.