लोनाड : हौसेला मोल नाही हा शब्दप्रयोग बऱ्याच वेळा चेष्टेखातर वापरला जातो. परंतु भिवंडी तालुक्यातील वडपे गावातील शेतकरी असलेल्या उद्योजक जनार्दन भोईर यांनी चक्क हेलिकॉप्टर खरेदी केले आहे.भिवंडी तालुक्यात गोदाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारल्याने या भागात आर्थिक सुबत्ता आली आहे. ग्रामीण भागात महागड्या कार फिरताना नेहमीच दिसतात. एवढेच नव्हे तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात वापरली जाणारी कार भारतात प्रथम खरेदी करण्याचा बहुमान भिवंडी तालुक्यातील दिवेअंजूर येथील अरुण आर. पाटील या आगरी समाजातील उद्योजकाकडे जातो. आता भिवंडी तालुक्यातील वडपे या गावात राहणारे व मूळचे शेतकरी असलेले भोईर यांनी चक्क ३० कोटींचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना अचंबित केले आहे.भोईर यांनी बांधकाम व्यवसायाला सुरूवात करून आपल्या जमिनीवर गोदाम बनविले तर काही विकासकांना जमीन विकसित करायला दिली. त्यांचा व्यवसायानिमित्ताने उद्योजक, व्यावसायिक, चित्रपटसृष्टीतील व्यक्तींशी संपर्क आल्याने त्यांनी या नव्या व्यवसायाचे धाडस केले. स्वतःच्या दुग्ध व्यवसायासाठी पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान येथे नेहमी जावे लागते, तर व्यावसायिक संबंधातील व्यक्तींना या भागात येण्यासाठी हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय घेतल्याचे भोईर यांनी सांगितले.
विजयी सदस्यांना फेरफटकाहे हेलिकॉप्टर १५ मार्च रोजी येणार आहे. त्यांच्या जागेवरील व्यवस्थेची चाचपणी करण्यासाठी मुंबई येथून काही तंत्रज्ञ रविवारी हेलिकॉप्टर घेऊन वडपे गावात आले. तिथे अडीच एकर जागेवर संरक्षक भिंतीसह हेलिपॅड, हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी गॅरेज, पायलट, इंजिनिअर, सुरक्षारक्षक यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. हेलिकॉप्टरमध्ये भोईर यांनी स्वतः न बसता ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी सदस्यांना फेरफटका मारून आणला.