भिवंडी - तेल व औषधांचा साठा केलेल्या गोदामांना भीषण आग लागल्याची घटना भिवंडीत बुधवारी घडली आहे.या आगीत दहा गोदाम जळून खाक झाले असून अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
पुर्णा ग्रामपंचायत हद्दीतील अरीहंत कंपाऊंड येथील खाद्य तेल व औषधे साठविलेल्या गोदाम इमारतीस ही आग लागली होती ज्यात दहा गोदाम जळून खाक झाली आहेत. येथील तळ अधिक एक मजली या इमारतीत टोरेंट फार्मास्युटीकल्स कंपनीचे गोदाम असून तेथे तळमजल्या वर खाद्य तेल तर पाहिल्या मजल्यावर औषध साठा साठविलेला होता. लागलेल्या आगीने उग्र रूप धारण केल्याने गोदामातील संपूर्ण साठा जळाला असून ही आग इतकी भयानक होती की,या आगीत संपूर्ण इमारत मागील बाजूस कोसळून तेथिल चाळीचे नुकसान झाले आहे.
आगीची महिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन तर आग वाढल्याने कल्याण व ठाणे येथील प्रत्येकी एक अशा चार फायर फायटर गाड्यांनी स्थानिक पाण्याच्या टँकरच्या मदतीने ही आग सुमारे सात तासांनी आटोक्यात आली आहे. या आगीच्या ज्वालांनी या गोदाम इमारतीचा मागील संपूर्ण हिस्सा मागील बाजूस असलेल्या चाळीवर कोसळला त्यामुळे चाळीतील दोन खोल्यांचे नुकसान झाले असून एक दुचाकी ढिगाऱ्या खाली गाडली गेली.या दुर्घटने नंतर स्थानिक तलाठी सुधाकर कामडी यांनी पुर्णा ग्रामपंचायत व नारपोली पोलीस यांच्या मदतीने घटनास्थळी आग विझविण्यासाठी विशेष परिश्रम घेत खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिल्याने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे. विशेष म्हणजे या भागांमध्ये जेव्हा जेव्हा आगीच्या घटना घडतात त्या त्या वेळेस पाण्याची मोठी समस्या निर्माण होत असते त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मदतीनेच अग्निशमन दलाला आग विझविण्याची वेळ येत असते.