भिवंडीत वारंवार लागणाऱ्या आगींचे कारण अस्पष्ट असले तरी या गोदामपट्ट्यात सतत लागणाºया आगीच्या धुरात संशयाचे ढग जमा होत आहेत. विम्याच्या माध्यमातून आर्थिक लाभासाठीही या आगी लावल्या जात असाव्यात, अशी शंका नागरिकांमधून व्यक्त होत आहे. सतत लागणाºया या आगींमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मात्र, याकडे सरकारबरोबरच पोलीस प्रशासनही दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सरकार व पोलीस भोपाळसारख्या महाभयंकर घटनेची वाट बघते आहे का ? असा संतप्त सवाल येथील नागरिक विचारत आहेत.
भिवंडी तालुक्यातील सरकारी तसेच खाजगी जमिनीवर अनेक ठिकाणी बेकायदा गोदामे बांधली आहेत. गोदामांच्या विस्तीर्ण जाळ्यांमुळे औद्योगिक वसाहत असलेले शहर म्हणूनही भिवंडीला नावलौकिक मिळत आहे. दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या सर्व जीवनावश्यक वस्तूंची गोदामे भिवंडीत थाटली आहेत. त्याचबरोबर केमिकलचा साठाही या गोदामांमध्ये केला जातो. या बेकायदा गोदामांवर कारवाईचे आदेशही उच्च न्यायालयाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ही गोदामे सध्या तरी तुटणार नसल्याची चर्चा आहे. काही गोदामचालक व मालकांनी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बहुतांश गावे एमएमआरडीएच्या अधिकारात आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे व कारवाईचे अधिकार एमएमआरडीए प्रशासनाला आहेत. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन गोदामे पाडण्याची कारवाई सुरू होणार आहे. त्यासाठी सर्वेक्षणही सुरू केले आहे. भिवंडी परिसरात असलेल्या या बेकायदा गोदामांमुळे सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडाला आहे.
भिवंडी शहरासह ग्रामीण परिसरात असलेल्या शेकडो गोदामांमध्ये बेकायदा ज्वलनशील केमिकलची साठवणूक केली जाते. या साठ्यांवर कारवाईचे आदेश सरकारने देताच सुमारे १६५ गोदामांना नोटिसा बजावल्या. भिवंडीतील गोदामपट्ट्यात रासायनिक द्रव्याचा साठा व अन्य साधनसामग्रीच्या सुमारे ७४० गोदामांना वर्षभरात आगी लागल्या आहेत. या आगीच्या वाढत्या घटनांमुळे भिवंडीचा भोपाळ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने या गोदामांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
भिवंडी परिसरात काल्हेर, कशेळी, राहनाळ, वळ, गुंदवली, दापोडा, माणकोली, अंजूर, केवणी, कोपर, सारंग, सुरई, दिवे अंजूर, वेहळे, ओवळी, सरवली, कोनगाव, पिंपळास, सोनाळे, भोईरगाव, वाहुली, सापे, वडपे, पडघा आदी ग्रामपंचायतीच्या हद्दीत गोदामे असून यातील वळ, माणकोली, राहनाळ, गुंदवली, काल्हेर, दापोडे, सरवली, कोपर, पूर्णा, कोनगाव, भोईरगाव, वडपे, सोनाळे या ठिकाणी केमिकलची ३७० गोदामे असून याबाबत तपासणी करून १६५ गोदामांना नोटिसा दिल्या आहेत. या गोदामांमध्ये अत्यंत ज्वलनशील असा अतिधोकादायक केमिकलचा साठा आहे. त्यांची सुरक्षा नसल्याने वारंवार आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. पाच वर्षांपूर्वी राहनाळ येथे लागलेल्या आगीत लाकडाच्या वखारीत झोपेत असलेल्या ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता तर दापोडा येथे लागलेल्या आगीत ३ कामगारांचा बळी गेला. गोदामांना वारंवार आगी लागण्याच्या घटना सुरु असतानाच वळ ग्रामपंचायत हद्दीतील केमिकल, रबर, प्लास्टिक, डांबरसाठा असलेल्या गोदामांना भीषण आग लागली. या आगीत ५ गोदामे जळून खाक झाली. त्यामुळे पुन्हा एकदा बेकायदा केमिकल गोदामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोदामांवर कारवाईचे आदेश देऊनही आर्थिक संबंधांमुळे कारवाई होत नाही.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोदामपट्ट्यात अग्निशमन दल केंद्र उभारण्याची घोषणा केली होती. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष झाल्याने येथील आगीवर नियंत्रणासाठी भिवंडी शहरासह ठाणे, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, मुंबई येथील अग्निशमन दलास पाचारण करण्याची नामुश्की ओढवते.भिवंडीतील गोदामांना मागील काही महिन्यांपासून सातत्याने आगी लागत आहेत. यामुळे सामान्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. या गोदामांवर कारवाई करायला सांगूनही केवळ भ्रष्टाचारामुळे होत नाही हेही सत्य आहे. सरकारने बेकायदा गोदामांवर वेळीच कारवाई न केल्यास भिवंडीचे भोपाळ व्हायला वेळ लागणार नाही, हेही तितकेच खरे.