नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडी तालुक्यात आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असतांनाच भिवंडी नाशिक महामार्गावर असलेल्या सोनाळे ग्राम पंचायत हद्दीतील मुलामुलींच्या वसतीगृहास भीषण आग लावल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. वसतीगृहाला लागलेल्या आगीमुळे येथील ७४ विद्यार्थी अडकून पडले होते, सुदैवाने या सर्व विद्यार्थ्यांना अग्निशमन दल व स्थानिकांच्या अथक प्रयत्नाने सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे, मात्र आगीचे नेमकी कारण अजून समजू शकले नसले तरी शॉर्ट सर्किटने हि आग लागली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत अरहम लॉजिस्टिक कॉम्प्लेक्स या ठिकाणी एका इमारतीमध्ये ईडीयु लाईट या संस्थेचे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य केंद्र असून या ठिकाणी सोमवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली . पाहता पाहता हि आग दुसऱ्या मजल्यावरील वसतिगृहा पर्यंत पोहचली . इमारतीत धूर पसरल्याने वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी टेरेसचा आसरा घेतला त्यानंतर आलेल्या भिवंडी अग्निशामक दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास स्थानिकांच्या मदतीने प्रयत्न केला . या वसतिगृहात सध्या ७४ प्रशिक्षणार्थी असून त्यापैकी ३० मुली असून हे सर्व प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यातील असून त्यांना या ठिकाणी कॉल सेंटर एक्झिकेटीव्ह व डाटा इन्ट्रीचे तीन महिन्याचे प्रशिक्षण दिले जात आहे .
या आगीचे नेमकी कारण अजून स्पष्ट नसले तरी शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे बोलले जात असून ,अग्निशामक दलाच्या जवानांनी या सर्व प्रशिक्षणार्थींची सुखरूप सुटका स्थानिकांच्या मदतीने केली परंतु या आगीत सर्व प्रशिक्षणार्थींचे कपडे अत्यावश्यक साहित्य या आगीत पूर्ण जाळून खाक झाले आहे . स्थानिकांनी या सुटका केलेल्या सर्वाना नजीकच्या अरहम लॉजेस्टिक कार्यालयात बसविल्या नंतर रात्री त्यांच्या जेवण व राहण्याची व्यवस्था स्थानिकांच्या मदतीने नजीकच्याच प्रेसिडेन्सी स्कुल या ठिकाणी करण्यात आली असून यासाठी पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके यांनी देखील धाव घेत विद्यार्थ्यांच्या जेवण व राहण्याची व्यवस्था केली आहे.