भिवंडी : शहरात अवैध सुरू असलेल्या दोन मोती कारखान्यास गेल्या महिन्यात आगी लागूनही सरकारी बाबू त्याकडे दुर्लक्ष करून उलट त्यांना अभयच देत आहेत.शहरातील कल्याण रोड, शांतीनगर भागात मोठ्या संख्येने प्लास्टिकच्या दाण्यांपासून मोती बनविण्याचे कारखाने असून त्यापैकी अनेक व्यावसायिकांचे कारखानेच बेकायदेशीर आहेत. काहींनी पत्र्याच्या शेडमध्ये हा व्यवसाय सुरू ठेवलेला आहे. मात्र, शासनाच्या फॅक्टरी अॅक्टनुसार यांचे रजिस्ट्रेशन झालेले नाही. अशा बेकायदेशीर व्यवसायावर पालिकेच्या बांधकाम विभागाने व शासनाच्या नोंदणी विभागाने कारवाई केलेली नाही. या कारखान्यातील प्लास्टिक मोत्यांना रंग देण्याच्या प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारे रसायन कामगारांच्या शरीरासाठी घातक असताना त्यांची तपासणी शासनाच्या कामगार सुरक्षा व आरोग्य विभागाकडून केली जात नाही. यापूर्वी आग लागून प्राणहानी झाली असताना या अवैध मोती कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. परंतु, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे अशा अवैध व्यवसायास व व्यावसायिकांना शासनाकडूनच अभय दिले जात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. (प्रतिनिधी)
भिवंडीतील अवैध मोती व्यवसायास अभय
By admin | Published: June 09, 2015 10:50 PM