- नितीन पंडित भिवंडी - उन्हाळ्याच्या दिवसात रस्ता रुंदीकरण व रस्ता दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष करत असलेल्या भिवंडी महापालिकेने भर पावसात रस्ता रुंदीकरणाच्या नावाने नागरिकांची ९ घरे तोडून टाकल्याचा अजब प्रकार घडला आहे.या ९ घरातील नऊ कुटुंबियांवर भर पावसात रस्त्यावर ताडपत्री टाकून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. मात्र घरे तोडण्याआधी मनपा प्रशासनाने या नागरिकांसाठी कोणत्याही प्रकाराची निवाऱ्याची व्यवस्था केली नसल्याने येथील नागरिक मनपा प्रशासन विरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या धोबी तलाव,रोशन बाग परिसरात रस्ता रुंदीकरणाचे हाती घेणार असल्याने या रस्ता रुंदीकरणाच्या कामात मोहम्मद रमजान अब्दुल रहीम यांच्यासह इतर ८ अशा नऊ घरांना महापालिका प्रशासनाने २२ मे २०२४ रोजी नोटीस बजावत रस्ता रुंदीकरणात बाधित मिळकतीचा मोबदला निश्चित करण्यासाठी महापालिकेकडे कागदपत्र सादर करण्यासाठी नोटीस दिली होती. मात्र अवघ्या एक महिन्यांच्या नोटीस कालावधीतच मनपाने मोहम्मद रमजान अब्दुल रहीम यांच्यासह इतर आठ नागरिकांची घरे भर पावसात तोडली आहेत.
या परिसरात रस्ता रुंदीकरणाचे कोणतेही काम सध्या सुरू नसतांना मनपा प्रशासनाने निश्चित केलेल्या बाधित क्षेत्रात पेक्षा अधिक क्षेत्रात मनपाने बुलडोझर लावत हि सर्व घरे तोडून टाकल्याने गरीब कुटुंब रस्त्यावर आली आहेत.शुक्रवारी भर पावसात दसऱ्या घराच्या आडोशाला ताडपत्री बांधून हे कुटुंबीय रहात आहेत.भर पावसात अशा प्रकारे नागरिकांच्या निवाऱ्याची सोया न करता व घरांचा मोबदला न देता मनपा प्रशासनाने आमची घरे का तोडली असं सवाल येथील बाधीत कुटुंब विचारात आहेत. मनपा प्रशासनाने जाणीवपूर्वक आमची घरे तोडून आम्हाला बेघर केले आहे,ना मोबदला दिला ना राहण्याची व्यवस्था केली आता आम्ही परिवारासह राहणार कुठे असा सवाल या बाधीत कुटुंबातील महिला विचारत आहेत.
रस्ता रुंदीकरणासाठी येथील घरे बाधित झाली होती,येथील नागरिकांना मनपा प्रशासनाने नोटीस बजावल्या होत्या, मात्र ही घरे मनपाच्या जागेत असल्याने कोणताही मोबदला न देता तोडण्यात आली आहेत. अशी प्रतिक्रिया भिवंडी मनपा प्रभाग समिती चारचे प्रभाग अधिकारी सुनील भोईर यांनी दिली आहे.