भिवंडी : भिवंडी - कल्याण - शीळ या रस्त्याच्या कामात कंत्राटदाराने हलगर्जीपणा व मनमानी कारभार केला असून, या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष परेश चौधरी यांनी केला आहे. कंत्राटदारावर कारवाईची मागणी चौधरी यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कारवाई न केल्यास मनविसे आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे.
या मार्गावर नेहमीच वाहतूककोंडी होत असल्याने रस्ता रुंदीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू आहे. कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, उल्हासनगर तसेच मुरबाड येथे जाण्यासाठी हा रस्ता आहे. हा रस्ता सहापदरी काँक्रीटचा बनविण्यात येत असून, लॉकडाऊनच्या काळातही काम सुरू होते. परंतु, या काळात तयार केलेला रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार चौधरी यांनी केली आहे. साकेत इन्फ्रा कंपनी हे काम करत असून, कमी दर्जाचे सिमेंट वापरले जात आहे. ठिकठिकाणी रस्त्याला तडे जायला सुरुवात झालेली आहे.
भिवंडी बायपास येथे असलेल्या टाटा आमंत्रा या निवासी संकुलासमोर कंत्राटदाराने चक्क मातीवरच रेडिमिक्स सिमेंट टाकून रस्ता बनवला असल्याचे पुरावेही त्यांनी महामंडळाला सादर केले आहेत. रस्ता बनविताना सरकारी नियमांचे उल्लंघन कंत्राटदाराने केले असून, या संदर्भात आपण वेळोवेळी अधिकाऱ्यांकडे तक्रारी करत असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.