ठाणे - भिवंडी-कल्याण शिळफाटा रस्त्याच्या सहा पदरी रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन तथा पायाभरणी समारंभ रविवारी (30 डिसेंबर) दुपारी 3.30 वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. पलावा जंक्शन देसाई गाव येथे उड्डाणपुलाची पायाभरणी होईल. त्यानंतर दुपारी 4 वाजता पत्रीपूल येथे रुंदीकरण कामाच्या भूमिपूजनाचा मुख्य समारंभ होईल असे राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे. हा मार्ग सुमारे 21 किमी इतका असून शिळफाटा ते रांजनोली जंक्शन असे काम होणार आहे.
कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार, बंदरे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, ठाणे महापौर मीनाक्षी शिंदे, कल्याण डोंबिवली महापौर विनिता राणे तसेच खासदार, आमदार यांची उपस्थिती असणार आहे असे महामंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार उपस्थित राहणार आहेत.
शीळफाटा रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी, या रस्त्यावरून नाशिक मार्गे आग्र्याकडे तसेच खाली गोवा- कर्नाटकाकडे होणारी अवजड रस्ते वाहतूक आणि त्यामुळे होणारे वाहतुकीचे प्रश्न या रुंदीकरणामुळे सुटणार आहेत. नाशिक, गुजरात, पुणे शहरांकडे जाण्यासाठी शीळफाटा, भिवंडी वळण रस्ता हा मधला मार्ग असल्याने अवजड साहित्याचे वाहतूकदार शीळफाटा रस्त्याला सर्वाधिक प्राधान्य देत आहेत.
212 कोटी खर्च
या मार्गाच्या रुंदीकरणासाठी 212 कोटी खर्च असून 16 ऑगस्ट 2018 रोजी कार्यादेश देण्यात आला असून मे. राम क्रिपाल सिंग हे कंत्राटदार काम करणार आहेत. 30 महिन्यात हे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे.
असे होणार काम
सहापदरी कामामध्ये पलावा जंक्शन येथे दोन पदरी उड्डाण पूल , दिवा –पनवेल रेल्वे मार्गावर कटई येथे रेल्वे उड्डाणपूल, पत्रीपूल येथे 2 पदरी रेल्वे पूल, 14 मोठे जंक्शन्स, 31 बस स्थानके, 2 पथकर स्थानके असे विविध स्वरूपाचे काम होणार आहे.