भिवंडी- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अंतर्गत लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यांमध्ये शासनाकडून दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. भिवंडी शहरातील अजूनही बहुसंख्य महिलांचे मोबाईल नंबर अपडेट नसल्याने महिलांनी आपल्या बँक खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे पाहण्यासाठी, कागतपत्रे जमा करण्यासाठी तर काहींनी बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी बँके बाहेर तसेच बँकेबाहेर ठेवण्यात आलेल्या पासबुक प्रिंटिंग मशीन समोर प्रचंड गर्दी केली होती.
यावेळी ज्या महिलांच्या बँक खात्यांमध्ये तीन हजार रुपये जमा झाल्याची प्रिंट होऊन येत होते त्या महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळच समाधानाचे हास्य दिसून येत होते, तर असंख्य महिला अजूनही बँक खाते आधार कार्डशी निगडित करण्यासाठी, केवायसी करण्यासाठी बँकांमध्ये गर्दी करून असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे उद्या शनिवार त्यांनतर रविवारी सुट्टीचे दिवस तर सोमवारी रक्षा बंधन सण यासाठी महिलांनी शुक्रवारी शहरातील सर्वच बँकांमध्ये गर्दी केली होती.
बँक खात्यात पैसे जमा झाल्याने अनेक महिलांच्या चेहऱ्यावर आनंद व स्मित हास्य दिसत होते.तर दुसरीकडे बँकांमधील वाढत्या गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत काही महिलांनी व्यक्त केले. लाडक्या बहिणी योजनेतील लाभार्थी महिलांनी हे पैसे बँक खात्यात आल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार व्यक्त करून समाधान व्यक्त केले आहे.